सोन्याचे मोल असणाऱ्या जमिनी, मातीमोल किमतीने विकू नका !

0

एमएमआरडीए केएससी नवनगर विरोधी समितीचे आवाहन 

उरण दि १०(विठ्ठल ममताबादे )

सोन्याचे मोल असणाऱ्या जमिनी, मातीमोल किमतीने विकू नका असे आवाहन एमएमआरडीए केएससी नवनगर विरोधी समिती रायगड तर्फे शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. तिसऱ्या मुंबईच्या निमित्ताने उरण पनवेल, पेण तर चौथ्या मुंबईच्या निमित्ताने रायगड जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यातील जमींनीना विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या सर्व तालुक्यात शेतकऱ्यांना, जमीन मालकांना विविध प्रलोभने, आमिष दाखवून मोठया प्रमाणात जमीन कमी किंमतीत विकत घेण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा शेतकऱ्यांची या बाबतीत मोठया प्रमाणात फसवणूक सुद्धा झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर एमएमआरडीए केएससी नवनगर विरोधी समिती रायगड तर्फे शेतकऱ्यांना आपल्या पिकत्या जमिनी विकू नका, सोन्याचे मोल असणाऱ्या जमिनी मातीमोल किमतीने विकू नका असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकरी बांधवांनो, आपल्या विभागात जमिनी खरेदी करणारे बाहेरचे लोक (पार्टीवाले) वेडे नाहीत. आपल्या जमिनी स्वस्तात घेवून, भविष्यात तेच फायदा उठविणार आहेत. कारण काही वर्षांनी येथील जमिनीला प्रचंड भाव मिळणार आहे. याची त्यांना पूर्ण जाणीव आहे. म्हणून आपल्या वाडवडिलांपासून आपल्या उपजिवीकेचे साधन असणाऱ्या जमिनी दोन-चार लाख गुंठा भावाने विकू नका, दलालांच्या भूलथापांना बळी पडू नका! आपल्याला, विशेषतः तरुणांना आमची कळकळीची विनंती आहे की, आपल्या आजोबा-पणआजोबांनी जीवापाड जोपासलेली आपली काळी आई कवडीमोल किमतीला विकू नका, जरा धीर धरा, एमएमआरडीए विरोधी संघर्षात सामील व्हा, संघर्ष करून आपण न्याय मिळवू हा आम्हाला विश्वास आहे. कृपया समिती तर्फे काढण्यात आलेले पत्रक सर्वांनी वाचा आणि दुसऱ्यांनाही वाचायला द्या.असे आवाहन एमएमआरडीए केएससी नवनगर विरोधी समिती रायगड तर्फे शेतकऱ्यांना, जमीन मालकांना करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here