भिलार : सायघर (ता.जावळी) येथे स्ट्रॉबेरी शेताच्या मळ्यात अनोळखीने रात्रीच्या वेळी तणनाशकाची फवारणी केल्याने पूर्ण शेतातील स्ट्रॉबेरी रोपे जळून खाक झाली आहेत. यामध्ये तीन शेतकऱ्यांचे सुमारे ३० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
मेढा-भिलार रस्त्याशेजारी असणाऱ्या सायघर गावच्या हद्दीत बाबू गणपत धनावडे यांची १४ हजार स्ट्रॉबेरी रोपांची लागवड केलेले शेत, श्रीरंग कोंडिबा धनावडे यांची दहा हजार स्ट्रॉबेरी रोपांची लागवड केलेले शेत आणि अंकुश धनावडे यांची दहा हजार स्ट्रॉबेरी रोपांची लागवड केलेले शेत अशा तिघांच्या ३४ हजार रोपांची लागवड केलेल्या तिन्ही मळ्यांत अज्ञाताने रात्रीच्या वेळी गवतावर मारण्यात येणाऱ्या तणनाशकाची फवारणी केली. यामुळे या तिन्ही मळ्यातील स्ट्रॉबेरीची रोपे जळून खाक झाली आहेत.
यामुळे हे सर्व शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. दिवाळीनंतर नुकतेच फळांचे उत्पादन सुरू झाले होते. आता कुठे आर्थिक उत्पादन सुरू असतानाच अशा मानवी हल्ल्याने हे शेतकरी पूर्णपणे कोलमडले आहेत.
यामध्ये बाबू गणपत धनावडे यांचे अंदाजे दहा लाख रुपये, श्रीरंग कोंडिबा धनावडे यांचे आठ लाखांचे आणि अंकुश धनावडे यांचे आठ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. याबाबत या तिघांनी मेढा पोलिस ठाण्यात अनोळखीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.
दरम्यान, या नुकसानीने हे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. अगोदरच अतिपाऊस आणि बदलते हवामान यामुळे स्ट्रॉबेरी संकटात असताना आता अशा मानवी हल्ल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. या अनोळखीचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.
हातातोंडाशी व काढणीच्या बेतात आलेले पीक डोळ्यादेखत उजाड करणाऱ्यांना पोलिसांनी तातडीने पकडून त्यांच्यावर कारवाई करावी.
-अंकुश धनावडे, शेतकरी