सातारा : जिल्ह्यात दसऱ्यानंतर सर्व तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) मेळावे घेऊन पक्ष संघटनावाढीसाठी प्रयत्न करणार आहे. लवकरच जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाणार असून जिल्ह्यामध्ये अजितदादांची राष्ट्रवादी 100 टक्के एक नंबर राहण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असा ग्वाही विधान परिषदेचे माजी सभापती आ.रामराजे नाईक निंबाळकर यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैठकीत दिली.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक जिल्हा दूध संघाच्या सभागृहात झाली. याप्रसंगी आ. रामराजे बोलत होते. यावेळी आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, माजी कृषी सभापती मंगेश धुमाळ, अमित कदम, बाळासाहेब सोळस्कर, राजेंद्र लवंगारे, स्मिता देशमुख, निवास शिंदे उपस्थित होते.
रामराजे म्हणाले, “”जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अजितदादांच्या विचाराबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राज्यपातळीवर होणारे निर्णय बघू. आपल्याला विचाराचे, विकासाचे राजकारण करायचे आहे. सर्व तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाची ताकद वाढवण्यासाठी मतदारसंघाची बांधणी करावी लागणार आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाला जशी साथ दिली त्याच पध्दतीने त्याच जिद्दीने अजित पवारांच्या नेतृत्वाला साथ द्यावी लागणार आहे. अजित पवारांशिवाय पर्याय नाही. तालुकास्तरावर मेळाव्यातून वैचारिक भूमिका स्पष्ट करावी लागेल.” जिल्ह्यात दुष्काळाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोणतीही निवडणूक जाहीर झाली तरी आपणाला बेसावध राहून चालणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
आ. मकरंद पाटील म्हणाले, “राष्ट्रवादी कॉंग्रेस म्हणूनच अजित पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. शरद पवार आपले दैवतच आहेत. ते आजही आपल्या हृदयात आहेत. अजितदादांची राष्ट्रवादी ही या जिल्ह्यामध्ये कशी मोठी होईल त्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संघटनावाढीसाठी वेळ देणे गरजेचे आहे. वाई व फलटण विधानसभा मतदारसंघात पक्ष बांधणीची अडचण नसली तरी इतर तालुक्यांत काम करण्याची आवश्यकता आहे.”
यावेळी संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी सभापती संदीप मांडवे, प्रा. बंडा गोडसे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवाजीराव महाडिक, किरण साबळे- पाटील, राजेश पाटील वाठारकर, राजाभाऊ उंडाळकर, मनोज पोळ, संजय देसाई, दत्तानाना ढमाळ, डी. के. पवार, प्रमोद शिंदे, राजेंद्र राजपुरे, दत्तात्रय अनपट, सीमा जाधव, रेश्मा भोसले, अरूण माने, ऍड. मेघराज भोईटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, पक्षाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी अमित कदम व जिल्हा सरचिटणीसपदी निवास शिंदे यांच्या निवडी यावेळी करण्यात आल्या.