सातारा : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निषेधार्थ सातारा येथे मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन शुक्रवार दि.२७ रोजी देण्यात येणार आहे.त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विवीध आंबेडकरवादी विचारांच्या संघटनांच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदीय सभागृहात काही कारण नसताना विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अवहेलना करणारे वक्तव्ये केल्याने संपूर्ण विश्वातील आंबेडकरी अनुयायी यांच्या भावना दुखावल्या गेल्याने त्यांनी देशाची माफी मागावी. शिवाय, त्यांचा राजीनामा घेण्यात यावा. या व इतर मागण्याबाबत लोकशाहीच्या मार्गाने शांततेत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.तेव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परीसरात शुक्रवार दि.२७ रोजी सकाळी ११ वा. एकत्रीत येऊन पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.तद्नंतर शहरातून जिल्हाधिकारी कार्यालयामोर मोर्चाची सांगता होणार आहे. सरतेशेवटी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे.