अनिल वीर सातारा : छत्रपती संभाजीनगर येथील प्रा. डॉ. संतोष देशमुख यांच्या,” तिच्या सेल्फीत तो दिसत नाही.” या कवितासंग्रहाचे प्रकाशन मंगळवार दि. ४ रोजी शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र.कुलगुरू प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांच्या शुभहस्ते सायंकाळी साडेपाच वाजता येथील दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म.सा.प. पुणे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी असणार आहेत.
एकूण ५० कवितांचा कवितासंग्रह असून यात स्री भावविश्वाचा आलेख मांडलेला आहे. समाजाच्या महत्त्वाच्या असणाऱ्या स्री घटकाची उपेक्षितता आणि त्यामुळे तिच्या वाट्याला आलेलं अभावग्रस्त जगणं हा या कवितासंग्रहाचा आशय आहे. स्री दुःखाचे वेगवेगळे पदर कवीने या कवितांद्वारे अधोरेखित केलेले आहे. मुलगी, पत्नी व आई या भूमिकांमधून वावरत असताना तिची होणारी मानसिक आंदोलने या कवितासंग्रहात टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. या कवितासंग्रहास प्रसिद्ध कवयित्री प्रिया धारूरकर यांची प्रदीर्घ प्रस्तावना लाभलेली असून डॉ. महेश खरात यांनी मलपृष्ठ लिहून या कवितासंग्रहाची पाठराखण केली आहे.
या कवितासंग्रहावर प्रोफेसर डॉ. महेश खरात (कवी, समीक्षक, कादंबरीकार), माननीय कांता भोसले (लेखिका व कवयित्री), ॲड सीमंतिनी नुलकर (लेखिका) हे मान्यवर भाष्य करणार आहे.यावेळी शिरीष चिटणीस (कार्यवाह, म.सा.प. पुणे),मनोहरराव देशमुख (झोनल मॅनेजर, बुलढाणा अर्बन पतसंस्था, पुणे) व विनायक भोसले (व्यवस्थापक, दीपलक्ष्मी पतसंस्था) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.