आनेवाडी टोलनाक्यावरील महाकाय होर्डिंग कोसळली

0

सातारा : पुणे ते सातारा महामार्गावर आनेवाडी टोलनाक्यावर उभी असलेली चार ते पाच मोठी होर्डिंग वादळी वारे व पावसात कोसळून पडली असल्याने टोलनाक्यावरील सुरेक्षचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. मात्र, या परिसरातील होर्डिंगबाबत प्रशासनाने कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.
गत दोन दिवसात आनेवाडी परिसरासह जिल्ह्यात सर्वत्रच वादळी वारे व अवकळीने थैमान घातले आहे. वार्‍याचा वेग एवढा प्रचंड आहे की अनेक ठिकाणी झाडांची व घरांचीही पडझड झाली आहे.
तर आनेवाडी टोलनाक्यावरील सुमारे 100 ते 150 फूट उंचीचे चार ते पाच मोठे होर्डिंग कोसळले आहेत. सुदैवाने ही होर्डिंग कोसळली तेव्हा तिथे वाहने तसेच कोणीही नागरिक उपस्थित नव्हते. त्यामुळे जीवीतहानी टळली असली तर ही घटना पाहिल्यानंतर वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.
दरम्यान, हाती आलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्गावर कोणतीही परवानगी न घेता उभारलेले हे होर्डिंग दरवर्षाला लाखोंची कमाई करत असतात. मात्र वादळी वार्‍यात या होर्डिंगच्या परिसरात जाणार्‍या येणार्‍या वाहनांच्या बाबतीत कोणतीही सुरक्षितता घेतली गेली नसल्याची धक्कादायक बाब या घटनेच्या निमित्ताने समोर आलेली आहे.
घाटकोपरच्या घटनेनंतर सातार्‍यात मोठमोठाले होर्डिंग कोसळण्याच्या घटना घडल्या त्याचबरोबर पुणे सातारा महामार्गावरील आनेवाडी टोल नाक्याच्या लगतच 100 ते 150 फूट उंचीचे चार ते पाच मोठे होर्डिंग कोसळल्याने नागरिक तसेच महामार्गावर प्रवास करणार्‍या वाहन चालकांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
परिसरातील होर्डिंगचे ऑडिट आवश्यक
दरम्यान, आनेवाडी टोल नाक्याच्या जवळच चारी बाजूने 60 ते 70 मोठे होर्डिंग आहेत. ते केव्हाही अशा वादळीवार्‍यामध्ये कोसळू शकतात. अद्यापही यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही
ही मोठी होर्डिंग उभी करण्यासाठी परवानगी आहे की नाही, तसेच परवानगी दिली असल्यास सुरक्षेबाबत प्रशासनाकडून काय हमी घेतली आहे की नाही ? असा सवाल यानिमित्ताने आनेवाडी परिसरातील नागरिक करत आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here