मेढा : सातारा जावळीचे आमदार विकास कामांपेक्षा ठेकेदारांना जगविण्याचे काम करत असून मेढा स्मशानभूमी, नांदगणे पुनवडी पुलाबरोबरच जनतेच्या अनेक जिव्हाळ्याचे महत्वाचे प्रश्न सोडविण्यास लोकप्रतिनिधींना अपयश येत असल्याचा आरोप शिवसेनेच्या उबाटा गटाचे जावळी तालुक्यातील नेते एस. पार्टे (गुरुजी) यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.
पार्टे म्हणाले, आमदार गेली १५ वर्ष एकहाती सत्ता भोगत असताना त्यांनी विकास कामांपेक्षा ठेकेदारांसह हितचिंतकांनाच जगविण्याचे काम केले आहे. त्यामुळे तालुक्यातील कामे निकृष्ट होत असून अनेक महत्वाची कामे प्रलंबित आहेत. तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेवर लोकप्रतिनिधींचा वचक नसल्याने सर्वच शासकीय कार्यालयात मनमानी सुरु आहे. शासकीय कामासाठी नागरिकांना, विद्यार्थांना हेलपाटे मारावे लागत आहेत.
मेढा येथील स्मशानभूमीचा प्रश्न ज्वलंत असून लोकप्रतिनिधी व नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांना हा प्रश्न अद्याप सोडविण्यात अपयशी ठरले आहेत. मेढा नगरपंचायत झाल्यापासून नागरिकांच्या अनेक समस्या वाढल्या आहेत. विकास आराखडा, करवाढ असे प्रश्नही अद्याप सुटले नाहीत. येथील आरोग्य सेवा सलाईनवर आहे. वीज, पाणी यांचाही ज्वलंत प्रश्न आहे. पाझर तलाव, बाजारपेठेतील विद्युत रोषणाई व सुशोभिकरणापेक्षा नागरिकांच्या गरजेचे ज्वलंत प्रश्न मार्गी लावणे गरजेचे असताना विकास निधीची उधळपट्टी झालेलीच पाहावयास मिळत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
सत्ता आहे म्हणून राजकारण नक्कीच करा, पण ते जनतेच्या हिताचे असावे. शिवसेना ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करते. मेढा नगर पंचायतीमध्ये पहिला नगराध्यक्ष आमचा झाला. तेव्हा जनहिताचे निर्णय घेण्यात आले. मात्र, नंतर त्यांचा नगराध्यक्ष असताना त्यांना महत्वाचे निर्णय घेता आले नाहीत. असे त्यांनी स्पष्ट केले. अतिवृष्टीमध्ये वाहून गेलेला नांदगणे पूल प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना गेल्या तीन वर्षात बांधता आला नाही. यापुढे जनतेच्या विविध प्रश्नांसाठी शिवसेना (उबाठा) तीव्र आंदोलने छेडणार असल्याचा इशारा पार्टे (गुरुजी) यांनी दिला. मेढा येथील स्मशानभूमीची बिकट अवस्था असून पावसाळ्यात अंत्यविधीसाठी खूप अडचणी निर्माण होतात. त्यामुळे हे काम प्राधान्याने करण्याची मागणीही यावेळी त्यांनी केली .