मुंबई : महाविकास आघाडी आणि महायुतीच्या लोकसभा मतदार संघातील काही जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा ही महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला आली आहे.
मात्र सातारा लोकसभा मतदार संघासाठी शरद पवार गटाकडून अद्याप उमेदवार ठरत नाही. असे असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे सातारा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
सिल्व्हर ओक येथे झालेल्या भेटीत पुरुषोत्तम जाधव आणि शरद पवार या दोघांमध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत तासभर चर्चा झाली. दरम्यान, खासदार श्रीनिवास पाटील यांनी तब्येतीचे कारण सांगून निवडणुकीतून माघार घेतली आहे. असे असले तरी साताऱ्यात त्यांच्याच नावाला पसंती मिळत आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी चिन्हावरच उमेदवार द्यावा, अशी आग्रही मागणी जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून होत आहे.
तर येथून आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने आणि सत्यजित पाटणकर यांच्या नावाची चर्चा आहे. यात शशिकांत शिंदे आणि बाळासाहेब पाटील यांची नावे आघाडीवर होते. तर येथे पृथ्वीराज चव्हाण यांचेही नाव चर्चेत होते. मात्र त्यांनीही तुतारीच्या चिन्हावर लढण्यास नकार दिल्याने त्यांचे आघाडीवर असलेले नाव मागे पडले आहे. काँग्रेससाठी शरद पवार गटाने प्रस्ताव दिला, तर आपण निवडणूक लढू, असेही त्यांनी जाहीर केले होते.
या भेटीनंतर पुरुषोत्तम जाधव म्हणाले, “मी 2009 व 2014 मध्ये सातारा लोकसभा लढलो आहे. 80 वर्षांचा योद्धा शरद पवार हे कुस्तीवर प्रेम करणारे असून, मीही कुस्तीवर प्रेम करणारा आहे. मी 2009 मध्ये सेना-भाजपचा उमेदवार होतो. 2014 मध्ये अपक्ष लढताना मला मोदींच्या लाटेत देशातील दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. 2019 मध्ये मला थांबविण्यात आले.”
पुढे ते म्हणाले, “सातारा जिल्हा विकासापासून वंचित असून, या व्यथा सोडविण्यासाठी निवडणूक लढली पाहिजे. मी सर्वांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. त्यामुळे मला उमेदवारी मिळेल, अशी आशा आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटलो आहे. आता खासदार शरद पवार यांचीही भेट घेतली असून ते साताऱ्यात क्रांती करण्याची संधी मला देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.” दरम्यान, काल शरद पवार गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये सातारा लोकसभेसाठी उमेदवाराची घोषणा केली जाईल, अशी चर्चा होती. मात्र तसे झाले नाही.