अकलूज : मला आज एका माणसाला उत्तर द्यायचं आहे, त्यांना आपण माळशिरसमधून निवडून दिलं आहे. माळशिरस तालुक्यात ७० ते ७५ वर्षांत जेवढा विकास झाला नाही, तेवढा विकास मी अडीच वर्षांत केला, असं विधान त्यांनी केलं.
आमचं त्यांना उत्तर आहे की, विजयदादांच्या सांगण्यावरून एका रात्रीत तुम्हाला आमदार केलं. तसं एका रात्रीत तुमचं पार्सल बीडला माघारी पाठवयाची आमच्यात धमक आहे, असा इशारा धैर्यशील मोहिते पाटील यांनी आमदार राम सातपुते यांना दिला.
धैर्यशील मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष प्रवेशासाठी अकलूजमध्ये आज मेळाव्याचे आयोजन केले होते. त्या मेळाव्यात बोलताना धैर्यशील यांनी आमदार सातपुते यांना इशारा दिला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील, नारायण पाटील, अभिजित पाटील, मेहबूब शेख यांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
मोहिते पाटील म्हणाले, मी अकरा एप्रिल रोजी भाजपचा राजीनामा दिला. त्या वेळी महात्मा फुले यांची जयंती होती. मी आज एक राजकीय निर्णय करत आहेत आणि एक योगायोग बघा आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. हे योगायोगाने घडून येत आहे. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी कार्यकर्त्यांना आणि जनतेला विश्वासात घेऊनच निर्णय घेतला आहे. ते शेकापमधून काँग्रेसमध्ये जात असताना या शिवरत्न बंगल्यावरच सर्वांना विचारात घेऊन निर्णय घेतला. तीच परंपरा आपण 2019 मध्ये जपली, तुम्हाला विचारूनच निर्णय घेतला आणि आजसुद्धा मोहिते पाटील परिवार तुम्हाला विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही.
भाजपने 2019 मध्ये आदेश दिल्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील यांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं की आपल्याला काम करायचं आहे. आपण सर्वांनी कोणताही प्रश्न न विचारता एका उमेदवाराला निवडून दिलं. रणजितदादा, राजसिंह मोहिते पाटील यांनी एक घोषणा केली आणि आपण एक लाख 16 हजारांचे मताधिक्य दिले. त्यानंतर आपण सोलापूर जिल्हा परिषदेला भाजपची सत्ता आणून दिली. माळशिरसला आपण आमदार दिला. पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत दादाला मानणाऱ्यांनी भाजपचे काम केले, असे धैर्यशील म्हणाले. लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश होणार
ते म्हणाले, विजयदादांनी खासदार असताना निधी काय असतो, हे दाखवून दिले. विरोधी पक्षात असूनही त्यांनी गडकरींच्या मदतीतून करून दाखवलं आहे. सातारा-पंढरपूर, सातारा-लातूर रस्ता विजयदादांच्या काळात मंजूर झाला. विजयदादा आणि रणजितदादांच्या पाठपुराव्यामुळे पंढरपूर-फलटण लोहमार्गाचे काम मार्गी लागले.
नीरा देवघर धरणासाठी विजयसिंह मोहिते पाटील, रामराजे नाईक निंबाळकर यांनी योगदान दिले आहे. पण, नीरा देवघर उर्वरीत कामाच्या बैठकीसाठी खासदाराने विजयदादा आणि रणजितदादांना न बोलवता विरोधी पक्षातील आमदारांना घेऊन गेले. कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेलाही विरोध केला. त्या योजनेचे नाव बदलून आता नव्याने तीच योजना आणली आहे. मोहिते पाटील यांना श्रेय मिळू नये, यासाठी खटाटोप, असेही धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्पष्ट केले.