एकीकडे महिला दिन आणि दुसरीकडे मृत्यूनंतरही तिची उपेक्षाच

0

वीज कोसळून ठार झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांची वर्षभरापासून मदतीसाठी फरफट*             

सातारा/ प्रतिनिधी :  देशभरात सर्वत्र महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम होत असताना दुसरीकडे मात्र मृत्यूनंतरही तिच्या पदरी उपेक्षाच येत आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये वीज कोसळून ठार झालेल्या प्रतीक्षा अमर बगाडे या रायगाव (ता. जावली) येथील महिलेची ही दुर्दैवी कहानी असून केवळ जिल्हा रुग्णालयाच्या दाखल्यातील अपुर्ण शेऱ्यामुळे मृत्यूनंतरही तिची परवड व कुटुंबीयांची फरफट होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.                             याबाबत अधिक माहिती अशी की, रायगाव (ता.जावळी ) येथील सौ. प्रतीक्षा अमर बगाडे (वय 27 ) ही विवाहिता दिनांक 8 एप्रिल 2022 रोजी अवकाळी पावसात वीज कोसळुन जागेवरच ठार झाली होती. 

आपल्या घरासमोरील शेतातील मोकळ्या जागेत आपले सासरे शिवाजी बगाडे, सासु सुनीता बगाडे, पती अमर बगाडे यांच्या समवेत वाळत घातलेली ज्वारी काढत असताना दुपारच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस सुरु झाला. त्याचवेळी सर्व ज्वारी घरात आणून ठेवल्यानंतर बाहेर राहिलेले पातेले आणण्यासाठी सौ. प्रतीक्षा तशाच पावसात गेल्या आणि नेमक्या त्याचवेळी विजेचा लोळ अंगास घासुन गेल्याने त्यांचा जागेवरच मृत्यु झाला. 

    नैसर्गिक आपत्तीमध्ये संबंधित विवाहिता जिवानिशी गेली, मात्र जिल्हा रुग्णालयातून शवविच्छेदन अहवालात  तांत्रिकदृष्ट्या त्रुटीदायक शेरा दिला गेल्याने संबंधित कुटुंबीय गेल्या महिन्यांपासून शासकीय मदतीपासून वंचित आहे. संबंधित दुर्घटनेचा पोलीस, तलाठी, वीज कंपनी आदींनी केलेल्या घटनास्थळाच्या वस्तुस्थितीदर्शक प्राथमिक पंचनामामध्ये वीज कोसळून नैसर्गिक आपत्तीमध्ये प्रतीक्षा बगाडे यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. मात्र जावली तालुक्याचे तहसील प्रशासन मात्र जिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालामध्ये वीज कोसळून मृत्यू झाल्याचा उल्लेख नसल्याने मदत देण्यात टाळाटाळ करत आहे. अशा परिस्थितीत 8 मार्च रोजी सर्वत्र महिला दिनाचे कार्यक्रम होत असताना रायगावमधील एका मृत महिलेला मात्र प्रशासनातील दिरंगाईमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू होऊन सुद्धा शासकीय मदत मिळू शकलेली नाही. संबंधित महिलेचे कुटुंबीय सरकार दरबारी वारंवार हेलपाटे मारत आहेत, मात्र शासकीय यंत्रणा केवळ नियमांचा बागुलबुवा करून तिच्या कुटुंबीयांची फरफट आणि मृत महिलेची मृत्यूनंतरही परवड करत आहेत.                       

*जावलीच्या महसूल प्रशासनाचा बेगडीपणा

गरीब कुटुंबातील एका महिलेचा नैसर्गिक आपत्तीमध्ये जीव जातो आणि शासकीय यंत्रणा मात्र कागदी घोडे नाचवत मदत देण्यामध्ये टाळाटाळ करते अशा परिस्थितीत महिला दिन साजरा करण्याचा अधिकार जावळी तालुका महसूल यंत्रणेला नाही, असे स्पष्ट टिका काही जागृत नागरिकांनी व्यक्त केली आहे.     सोबत मृत महिला प्रतीक्षा बगाडे हिचा आयडेंटिटीसाईज फोटो आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here