एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्यास चांगले भविष्य : बंडा जोशी

0
फोटो : पहिल्या वहिल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे दीपप्रज्वलन करताना बंडा जोशी शेजारी मान्यवर.

सातारा : विद्यार्थ्यांनी एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला तर तुम्हाला चांगले भविष्य आहे. वेळ वाचवणे हे पैसे वाचवण्यापेक्षा महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी कधीही निराश न होता प्रयत्न करायचे. यामुळे तुम्ही ध्येयापर्यंत  पोहोचू शकता. असे प्रतिपादन प्रसिद्ध हास्यकवी बंडा जोशी यांनी केले.

  अ.भा.मराठी बालकुमार साहित्य परिषद, पुणे ( शाखा- सातारा ) आणि लोकमंगल हायस्कूल,एम.आय.डी.सी. आयोजित पहिले एक दिवशीय बालकुमार साहित्य संमेलन-२०२२ विद्यालयामध्ये आयोजित करण्यात आले होते.तेव्हा संमेलनाध्यक्ष म्हणून हास्यकवी तथा एकपात्रिकार बंडा जोशी मार्गदशन करीत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी श्रीकांत देवधर, लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस, कवी व साहित्यिक  विजय सातपुते, अ. भा. मराठी बालकुमार साहित्य परिषद, पुणे शाखा साताऱ्याच्या अध्यक्षा सौ. शिल्पा चिटणीस, उपाध्यक्ष अभिजीत वाईकर, संस्थेचे सचिव अनिल चिटणीस, मुख्याध्यापिका नंदा निकम, बंधुत्व  प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर,माजी विद्यार्थिनी व अभिनेत्री तृप्ती शेडगे, झी मराठी वाहिनीवरील अप्पी आमची कलेक्टर या मालिकेचे सहाय्यक दिग्दर्शक रोहित पवार,  शिल्पकार योगेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

         बंडा जोशी म्हणाले,”माणूस आयुष्यामध्ये खळखळून हसतो. तेव्हा तो सुंदर व देखणा दिसतो.  आपणाला मन व बुद्धी दिलेली आहे. हे दोन्हीही प्रसन्न ठेवण्यासाठी खळखळून हसले पाहिजे. जगातले सर्वात सुंदर दृश्य म्हणजे एक माणूस बोलतोय व बाकीचे खळखळून हसत आहेत.मी निरीक्षण करता करता गमतीजमती शिकतो. वेळ एकदा तुमच्या हातातून गेली तर ती पुन्हा येत नाही. जीवनाचे वेळापत्रक बनवताना योगा करणे हे तुमच्या वेळापत्रकात पाहिजे तसेच तुम्हाला वाचनाचाही छंद पाहिजे. वाचनाच्या आवडीमुळे माझे शब्द सामर्थ्य  प्रचंड प्रमाणात वाढले. विद्यार्थ्यांनी काही ना काही अवांतर वाचन केले पाहिजे. ज्याचे वाचन चांगले आहे तो उत्तम गप्पा मारू शकतो. विद्यार्थ्यांनी वही घालून त्यामध्ये काय चांगले वाचले?/काय चांगले ऐकले? ते लिहिले पाहिजे. एखाद्या गोष्टीची आवड असेल तर तुम्हाला काम हे काम वाटत नाही. तुम्ही जर प्रचंड उत्साहाने करत आहात तर तुमची पिढी भाग्यवान आहे. कारण, तुम्ही मोबाईल, इंटरनेटवरून माहिती शोधू शकता.”

           शिरीष चिटणीस म्हणाले, “बंडा जोशी यांची जी काही जडणघडण झालेली आहे. ती त्यांना मिळालेल्या शिक्षकांमुळे झालेली आहे. विद्यालयामध्ये आपण बालकुमार साहित्य संमेलनासारखा एक वेगळा प्रयोग  करत आहोत. प्रत्येक शाळेमध्ये छोटे छोटे संमेलन घेण्याचा आमचा मानस आहे. या ठिकाणी बोलावण्यात आलेल्या तृप्ती शेडगे,  योगेश पवार व रोहित पवार हे विद्यालयाचे माजी विद्यार्थी असून हे तीन विद्यार्थी घडले त्यामध्ये या शाळेतील शिक्षकांचा वाटा आहे. आपल्याला विज्ञाननिष्ठ व्हायचे आहे. मी सध्या सुधा मूर्ती यांचे पुस्तक वाचतोय  त्यामध्ये विज्ञाननिष्ठ गोष्टी घेण्यासारख्या आहेत. आजच्या या बालकुमार साहित्य संमेलनामधून विद्यार्थ्यांना खूप काही घेण्यासारखे आहे. तुम्ही या संमेलनामधून काहीतरी घेऊन घरी जाणार आहात.”

    सौ.शिल्पा चिटणीस म्हणाल्या,  “गावाकडच्या मातीत जे अस्सल आहे ते अशा प्रकारे  पुढे येते ते शहरांमध्ये मिळत नाही. सध्या निसर्गाची ओढ माणसाला वाटायला लागलेली आहे. छोट्या छोट्या शाळेतून विद्यार्थी घडवण्याचे काम झाले पाहिजे. दरवर्षी,आपण नाट्य वाचन, कवी संमेलन हे उपक्रम सुरू ठेवणार आहोत. तिन्ही शाखेतले  शिक्षक यासाठी भरीव मदत करीत असतात. हा कार्यक्रम नुसताच ऐकायचा नाही तर त्यामधून काहीतरी घ्यायचे आहे.”

       आदिती सचिन पवार व प्राची प्रवीण पवार यांनी सूत्रसंचालन केले.स्वागतगीत लोकमंगल हायस्कूल, नागेवाडी – कुशी यांनी सादर केले.  

चौकट :  “काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता,”  हे गाणे डी.एम पाटील व नागेवाडी हायस्कूल मधील कर्मचाऱ्यांनी सादर करून बालकुमार साहित्य संमेलनाला एक वेगळी उंची प्राप्त करून दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here