ओझरे गावाने जोपासली वाचन संस्कृती ! आनंदली सर्व मुले-मुली !!

0

सातारा/अनिल वीर :जावळी तालुक्यातील ओझरे गावाने वाचन संस्कृती जोपासली आहे. वर्गणी गोळा करून गावात वाचनालय बांधले ही बाब उल्लेखनीय आहे.सभोवतालच्या गावांनी यातून प्रेरणा घ्यावी. असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह शिरीष चिटणीस यांनी केले.

        येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे निवृत्त अधिकारी श्रीराम  नानल चालवीत असलेल्या जनवाचक चळवळीकडून ओझरे येथील सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिकेला शंभर पुस्तके भेट देण्यात आली.पुस्तके पाहून मुला-मुलींचे चेहरे आनंदून गेले. अध्यक्षस्थानी पर्यावरणवादी व लेखक डॉ. संदीप श्रोत्री होते. 

      शिरीष चिटणीस पुढे म्हणाले, “ओझरे गावासारख्या लहान गावांतील शाळांना भविष्यात खूप महत्त्व येणार आहे. यशस्वी लोकांची चरित्रे वाचून विद्यार्थ्यांनी भविष्याचा निर्णय घ्यावा.”

          पुस्तके वाचून त्यावर छोटी छोटी टिपणी करण्याचे आवाहन डॉ. संदीप श्रोत्री यांनी अध्यक्षीय भाषणात केले. ओझरे गावाने पर्यावरणाची जपणूक केली आहे. हे वाचनालय ज्ञानमंदिर आहे.

   डॉ. श्रोत्री यांनी स्वतः लिहिलेली पाच पुस्तके वाचनालयासाठी अजित मर्ढेकरांकडे सुपूर्द केली. जनवाचक चळवळीचे मुख्य समन्वयक श्रीराम नानल यांनी चळवळीचा उद्देश सांगितला. ज्यांच्याकडे अतिरिक्त पुस्तके आहेत. ती आणून ज्यांना पुस्तके वाचावयाची आहेत त्यांना ती देण्याचे काम जनवाचक चळवळ करते. आतापर्यंत लोकांकडून मिळविलेली अडीच हजार पुस्तके सुमारे १७ वाचनालयांना देण्यात आली आहेत.देण्यात आलेली पुस्तके मुंबईच्या मीनलताई ओगले व ज्येष्ठ कवयित्री माधुरी ताम्हाणे देव यांनी दिली असल्याचे नानल यांनी सांगितले. मुलांनी पुस्तक वाचल्यावर त्यावर अभिप्राय लिहिल्यास चांगल्या अभिप्रायांना पुरस्कार देऊ. असेही त्यांनी जाहीर केले.  

  यावेळी ॲड. महेंद्र माने, अजित मर्ढेकर,विजय मर्ढेकर,अशोक लकडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी,ॲड. महेंद्र माने यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सरपंच अजित मर्ढेकर यांनी पाहुण्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले.अशोकराव लकडे यांनी विकास चळवळीची माहिती दिली.मुंबईला नोकरी करत असलेल्या ग्रामस्थांनी वर्गणी काढून वाचनालयाची इमारत बांधली. तसेच वाचनालयात सीसीटीव्हीही बसवण्यात आला आहे.विजय मर्ढेकर यांनी आभार मानले.  या कार्यक्रमात विश्वनाथ मोरे, भास्कर मर्ढेकर, आनंदराव इंगुळकर, संगीता मर्ढेकर,ललिता मर्ढेकर.संजीवनी चव्हाण व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here