अनिल वीर सातारा : श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगरवाचनालयातर्फे दिला जाणारा, “साहित्यिक ना.ह. आपटे साहित्य पुरस्कार” हा यावर्षीचा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र माने यांना प्रसिद्ध नाटककार कादंबरीकार अभिनेते अभिराम भडकमकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी मंचावर नगर वाचनालयाचे अध्यक्ष अजित कुबेर , विश्वस्त समितीचे अध्यक्ष अनंतराव जोशी आणि कार्यवाह वैदेही कुलकर्णी उपस्थित होत्या .
अभिराम भडकमकर म्हणाले, “एकाच साहित्य प्रकारात न अडकता डॉक्टर राजेंद्र माने यांनी कादंबरी, कविता,कथा, लेख ,नाटक असे विविध साहित्यप्रकार हाताळून साताऱ्याचे साहित्यिक विश्व समृद्ध केलेल आहे.त्यांची लेखणी डाव्या उजव्या अशा कुठल्याच विचारसरणीला शरण गेली नाही.आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवल्यामुळेच डॉक्टरांचे साहित्य तळागाळापर्यंत पोहोचले आहे.पुस्तकांच्या विविध आवृत्या निघत राहिल्या आहेत.समीक्षकांनी जरी त्यांचा सतत अनुल्लेख केला असला तरी त्यांचे साहित्य कायमच वाचले जाईल. कारण, ते समतोल भूमिका मांडत असतात .सातारचे साहित्य विश्व समृद्ध करण्यात डॉक्टर राजेंद्र माने यांचा सिंहाचा वाटा आहे . ना. ह. आपटे यांच्यासारख्या दिग्गज लेखकाच्या नावाचा पुरस्कार वाचनालयाने डॉक्टरांना देऊन त्यांच्या लेखन कार्याचा यथोचित असा गौरव केला आहे.”
सत्काराला उत्तर देताना डॉ.राजेंद्र माने म्हणाले,”वेदनेतून निर्माण होणारे साहित्य हे चिरंजीव असते.मी भोवतालची वेदना टिपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असतो.त्याचबरोबर ग्रंथ वाचन आणि माणूस वाचण्याचा प्रयत्न केला.त्यातून विषय मिळत गेले आणि विविध प्रकारचे लेखन घडले .नगर वाचनालयाचे सर्व संचालक मंडळ आणि नगर वाचनालयाचा सर्व स्टाफ यांनी गेली तीस वर्षे मला सहकार्य केलं . यात आकाशवाणी व वृत्तपत्रांचाही सहभाग आहेच . या सगळ्यांचाच मी ऋणी आहे .
साहित्यात इतकीच उंची प्राप्त होवो की माझे पाय नेहमी जमिनीला लागलेले आहेत.”या कार्यक्रमापूर्वी डॉक्टर राजेंद्र माने साहित्य दर्शन हा डॉक्टर आदिती काळमेख निर्मित कार्यक्रम वैदेही कुलकर्णी , चंद्रकांत कांबिरे ,प्रदीप कांबळे , मानसी मोघे व प्रचेतस काळमेख आणि डॉ अदिती काळमेख यांनी सादर केला .यामध्ये डॉक्टर माने लिखित विविध साहित्य प्रकाराची ओळख होईल. असे अभिवाचन करण्यात आले. त्यात कादंबरी , कथा ,कविता लेख ,एकांकिका या सर्व प्रकाराचा समावेश होता .
याच कार्यक्रमात डॉक्टर राजेंद्र माने यांच्या ‘वळणावरची माणसं ‘या व्यक्तीचित्र संग्रहाच्या तृतीय आवृत्तीचे प्रकाशनही करण्यात आले सूत्रसंचालन वैदेही कुलकर्णी यांनी केले .डॉक्टर श्याम बडवे यांनी प्रास्ताविक केले तर डॉक्टर रवींद्र भारती झुटिंग यांनी आभार मानले. सदरच्या कार्यक्रमास प्रा. श्रीधर साळुंखे,डॉ.ज्योत्स्ना कोल्हटकर,बानुबी बागवान , विजयराव पंडित,सुनील शेडगे , श्रीकांत कात्रे,सागर गायकवाड, तुषार भद्रे , विश्वास दांडेकर , ऍड. वर्षा देशपांडे , श्रीराम नानल, डॉ. संदीप श्रोत्री , सचिन प्रभुणे ,कल्याण राक्षे , सीमा नुलकर,विजयकुमार क्षीरसागर, कांता भोसले,मनीषा शिरटावले, अश्विनी कोठावळे,अनील वीर, आनंद ननावरे,जयंत लंगडे,गौतम भोसले, प्रल्हाद पारटे,एकनाथ तेलतुंबडे, अमित शेलार ,सादिक खान आदी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि माने परिवार उपस्थित होता .