कुपनलिका दुरुस्तीविना तीन महिन्यांपासून बंद

0

पुसेसावळी : येथील संभाजीनगर व थोरवेवाडी परिसरातील सार्वजनिक कुपनलिका सुमारे तीन महिन्यांपासून बंद असल्याने ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना सर्वसामान्य नागरिकांना करावा लागत आहे.
बंद अवस्थेतील कुपनलिका तातडीने दुरुस्त करुन नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.

पुसेसावळीच्या वाड्यावस्त्यासह सुमारे 35 कुपनलिका आहेत.त्यापैकी सुमारे 10 कुपनलिका बंद अवस्थेत आहेत. ज्या नागरिकांकडे वैयक्तिक कुपनलिका नाहीत अशा नागरिकांना पाण्यासाठी सार्वजनिक कुपनलिका हाच मोठा आधार आहे. मात्र,गेल्या तीन महिन्यांपासून दुरुस्ती होत नसल्याने नागरिकांतून संतापाचे वातावरण आहे.

माण-खटाव या दोन तालुक्यातील कुपनलिका दुरुस्तीसाठी फक्त एकच वाहन आहे.त्यामुळे दुरुस्तीसाठी ते कोणाच्याच वाट्याला येताना दिसत नाही.कुपनलिका दुरुस्तीसाठीचे वाहन व कर्मचारी संख्या वाढवली तर पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे.

कुपनलिका बंद असल्याने पशुधनासह नागरिकांना पाणी मिळत नाही.त्यामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन व्यवस्थापन कोलमडले आहे.कुपनलिका दुरुस्तीसाठी ग्रामपंचायत प्रशासनाने पत्रव्यवहार केला आहे.प्रशासनाने तातडीने यावर उपाययोजना करण्याची सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here