सातारा दि. 16: जिल्ह्यात सन 2022-23 मध्ये कृषि औजारांसाठी 6 हजार 229 शेतकऱ्यांना सुमारे 32 कोटी 63 लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये ट्रॅक्टर- 590 लाभार्थ्यांना 7 कोटी 26 लाख, पॉवर टीलर- 299 लाभार्थ्यांना 2 कोटी 50 लाख, इतर कृषि औजार ( रोटावेटर, पेरणी यंत्र, पल्टी नांगर, मळणी यंत्र, चाफ कटर)- 5 हजार 316 लाभार्थ्यांना 21 कोटी 77 लाख रुपयांचे अनुदान देण्यात आल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली.
भाडे तत्वावर कृषि यांत्रिकीकरण सेवेसाठी कृषि औजारे बँक स्थापना या घटकांसाठी 24 लाभार्थ्यांना 1 कोटी 10 लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.
यावर्षी कृषि यांत्रिकीकरण योजनेसाठी जिल्ह्यात 43 कोटी रुपयांचा कार्यक्रम प्रस्तावित आहे. या अनुषंगाने शेतकऱ्यांनी विविध कृषि औजारांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत. या योजनेंतर्गत ट्रॅक्टर – 1.25 लाख, पॉवर टीलर 85 हजार, स्वयंचलीत भात लावणी यंत्र 8 लाख, रिपर कम बाईंडर 2.5 लाख, पल्टी नांगर 89 हजार 500, रोटावेटर 50 हजार, पॉवर वीडर 75 हजार, मिनी राईसमिल 2.40 लाख, मिनी दाल मिल 1.50 लाख, मिलेट मील 5.40 लाख, कल्टीवेटर 50 हजार, चाफकटर 6 हजार 300 रुपये पर्यंतच्या मर्यादेत लाभ दिला जातो.
शासन आपल्या दारी योजनेंतर्गत या योजनेसाठी लाभ दिला जातो. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र, ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इत्यादी माध्यमातून महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी किंवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्रीमती फरांदे यांनी केले आहे.