कोरेगाव : हिवरे (ता. कोरेगाव) येथील विक्रम विजय खताळ या १२ वर्षीय शाळकरी मुलाचा खून त्याच्या विक्रम खताळ वडिलांनीच केला असल्याचे तपासात समोर आले आहे. आपल्यासारखाच मुलालाही कॅन्सर होईल, त्यानंतर त्याचे कसे होईल, असा विचार करून या आजारामुळे त्याचे हाल होऊ नयेत, म्हणून मुलाचा गळा आवळून खून केल्याची कबुली जन्मदात्या पित्यानेच पोलिसांकडे दिली.
पोलिसांनी संशयित पिता विजय खताळ याला अटक केली आहे. महत्त्वाचे म्हणजे विजय खताळ याला स्वतःला कॅन्सर झाल्याचा फक्त संशय होता. तरीही त्याने हे कृत्य केले आहे.
अधिक माहिती अशी, शनिवारी सायंकाळी विक्रम ऊर्फ प्रवण विजय खताळ याचा गळा आवळून खून झाला होता. खुनाच्या घटनेनंतर वाठार पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक (एलसीबी) गावात तळ ठोकून होते. मात्र, पोलिसांच्या हाती काही लागत नव्हते. गावातील अनेकांकडे याबाबतची चौकशी करण्यात आली. चौकशीमध्ये मुलाचे वडील विजय खताळ यांच्या जबाबात तफावत आढळत होती. यामुळे पोलिसांची तपासाच्या संशयाची सुई त्यांच्याकडेही गेली. त्या अनुषंगाने पोलिसांनी वडिलांची झाडाझडती घेतली. या चौकशीत पोलिसांनी विविध प्रश्नांचा भडीमार वडील विजय खताळ यांच्यावर केला.
सोमवारी रात्री उशीरा त्यांनी पोलिसांना कबुली दिली. यात वडिलांनीच मुलाचा खून केल्याचे समोर आल्यानंतर पोलिसही हडबडून गेले. पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि अरुण देवकर, सपोनि सुधीर पाटील, रविंद्र भोरे, शिवाजी भोसले, फौजदार पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलिस तानाजी माने, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, शरद बेबले, लेलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, राकेश खांडके, अमोल माने, अजित कर्णे, अविनाश चव्हाण, स्वप्नील दौड, विशाल पवार, रोहित निकम यांच्यासह वाठार पोलिसांनी कारवाईत सहभाग घेतला.