सातारा/अनिल वीर : महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड आयोजित २० व्या गिरिमित्र संमेलनामध्ये सातारा येथील रानवाटा निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन मंडळ या संस्थेला या वर्षीचा ‘गिरीमित्र संस्था सन्मान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. संमेलनाचे अध्यक्ष सरखेल कान्होजी आंग्रे यांचे ९ वे वंशज आणि इतिहास अभ्यासक रघूजीराजे आंग्रे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
यावेळी माउंट एव्हरेस्टची चढाई सर्वात कमी वेळात सर करण्याचा जागतिक विक्रम करणाऱ्या ‘फुन्जो लामा’ आणि एव्हरेस्ट सह अनेक दुर्गम शिखर पादाक्रांत करणाऱ्या डिक्की शेरपा या दोघी उपस्थित होत्या.सदरचा पुरस्कार रानवाटा मंडळातर्फे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील, कार्यवाह अॅड मानसी वैद्य, अॅड सीमंतिनि नूलकर, विशाल देशपांडे, सहकार्यवाह धनंजय कुलकर्णी आणि संस्थापक डॉ संदीप श्रोत्री यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
रानवाटा निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन मंडळ या संस्थेची स्थापना २० वर्षापूर्वी झाली होती. वृक्षारोपण,बीजोत्सव, पदभ्रमण, पक्षी निरीक्षण,आकाश निरीक्षण, प्लॅस्टिक निर्मुलन, कचरा व्यवस्थापन इ.निसर्गाच्या विविध अंगांनी संस्था कार्यरत आहे. या विविध विषयांवर चर्चा, व्याख्यान, स्लाईड शो, परिसंवाद, स्पर्धा या माध्यमातून पर्यावरण जागृतीचे कार्य संस्था प्रामुख्याने करत आहे. दुर्बिणी तयार करण्याची कार्यशाळा देखील संस्थेने आयोजित केली होती. पुष्प पठार कास, वारसा स्थळ म्हणून घोषित होण्यासाठी संस्थेने विशेष प्रयत्न केले. सज्जनगड येथे ४ थे दुर्ग साहित्य संमेलन रानवाटा तर्फे यशस्वी आयोजित करण्यात आले होते. रानवाटा तर्फे हरित सेना, सातारा तालुका ३५ शाळा मधील ५५० विद्यार्थी यांची कार्यशाळा ही सामाजिक वनीकरण विभाग यांच्या सहकार्याने आयोजित केली होती .
अखिल भारतीय युथ होस्टेलचे संघटक हृषीकेश यादव. गिरिप्रेमी अध्यक्ष उमेश झिरपे, महाराष्ट्र सेवा संघांचे अध्यक्ष चंद्रशेखर वझे, अशोकराव वाळिंबे, शिरीष चिटणीस, विख्यात गिर्यारोहक आशिष माने आणि अनेक मान्यवरांनी रानवाटा मंडळाचे अभिनंदन केले आहे.