गोठणेतील शेतकर्‍यावर रानगव्याचा प्राणघातक हल्ला

0

कोयनानगर : कोयना भागातील अतिदुर्गम असणार्‍या गोठणे गावातील शेतकरी दगडू सुर्वे (वय 55) हे गुरे चरायला गेले असता ओढ्याजवळ पाणी पिण्यासाठी आलेल्या रानगव्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. मंगळवार, दि. 2 जानेवारी ही घटना घडली. या हल्ल्यात रानगव्याने दगडू सुर्वे यांच्या पोटात शिंग घुसवून त्यांचा कोथळाच बाहेर काढला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेनंतर ग्रामस्थांनी तात्काळ सुर्वे यांना कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. वन्यप्राण्यांच्या वारंवार होणार्‍या प्राणघातक हल्ल्यामुळे वन्यजीव विभागा विरोधात असंतोष पसरला आहे. दुर्गम व डोंगराळ कोयना भागातील गोठणे गावात ओढ्याजवळ चरायला घेवून गेलेल्या शेतकरी दगडू सुर्वे यांच्यावर याच ओढ्यावर पाणी पिण्यासाठी आलेल्या रानगव्याने प्राणघातक हल्ला केला.

दुर्गम व डोंगराळ असणार्‍या गोठणे गावाला रस्ता व दळणवळणाची कोणतीच सुविधा नसल्याने गावातील ग्रामस्थांनी जखमी दगडू सुर्वे यांना डालीत टाकून उपचारासाठी हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. या हल्ल्यात रानगव्याने दगडू सुर्वे यांच्या पोटात शिंग घुसवल्यामुळे त्यांचा कोथळा बाहेर आला आहे. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी तात्काळ कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते अत्यवस्थ आहेत.कोयना भागात वन्यप्राण्यांकडून ग्रामस्थांवर होणारे हल्ले ही नित्याची बाब बनली आहे. याबाबतच्या वन्यजीव विभागाला अनेक तक्रारी देवूनही त्यांच्याकडून काहीही कार्यवाही होत नाही. वन्यप्राण्यांपासून आमचे सरंक्षण करा, अशी मागणी मळे, कोळणे, पाथरपुंज, नाव, गोठणे या गावांतील जनतेने केली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here