ग्रंथ महोत्सव ही सातारला मिळालेली देणगी : तुषार पाटील 

0

सातारा/अनिल वीर : मुलांच्या अंगातील काव्य, संगीत, क्रीडा आदी  गुण शिक्षकांनी हेरून शाळेने त्यांना चालना दिली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या अंगातील सुप्त गुणांना चालना देण्याचे काम जिल्हा ग्रंथ महोत्सवामुळे होत आहे.त्यामुळे ग्रंथ महोत्सव ही सातारला मिळालेली देणगी आहे. असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव तुषार पाटील यांनी केले.

      जिल्हा ग्रंथ महोत्सव समिती व  जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्यावतीने आयोजित केल्या जाणाऱ्या २२ व्या जिल्हा ग्रंथ महोत्सव २०२३ कवी संमेलन निवड चाचणीच्या उद्घाटनपर समारंभ श्री शिवछत्रपती वाचनालय येथे संपन्न झाला. तेव्हा  तुषार पाटील प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी परीक्षक राजेंद्र घाडगे, सावित्री जगदाळे, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे ( अध्यक्ष ), शिरीष चिटणीस ( कार्यवाह ), सुनिता कदम  ( समन्वयक ),डॉ. राजेंद्र माने, प्रल्हाद पार्टे, प्रदीप कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

                तुषार पाटील म्हणाले, “कवींचा आम्ही निश्चितच आदर करतो. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम शाळेमध्ये संस्थांनी केले पाहिजे. मी तर असेही म्हणेन की, शाळांमध्ये ३० ते ३५ टक्के भाग अभ्यासक्रमातील शिकवला पाहिजे.तर उर्वरित ज्ञान शाळांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना देणारे दिले पाहिजे.असे माझे मत आहे. कोरोना कालखंडानंतर आम्ही इयत्ता तिसरी ते दहावी पर्यंतच्या मुलांना वयानुसार जीवन कौशल्य अभ्यासक्रम आम्ही आमच्या शाळेमध्ये राबविला. ग्रंथ महोत्सव ही सातारला मिळालेली देणगी असून दरवर्षी आम्ही २० हजारांची पुस्तके ग्रंथ महोत्सवामधून शाळेसाठी खरेदी करतो.”

     शिरीष चिटणीस म्हणाले,”या ठिकाणी कवी संमेलनाची निवड चाचणी होत आहे. या कवी संमेलनामध्ये सहभागी झालेल्या १५ जणांची कविता सादर करण्यासाठी सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सवामध्ये निवड होणार आहे. या ठिकाणी होणाऱ्या ग्रंथ महोत्सवाचा फायदा जिल्ह्यातील कवींना होणार असून त्याची शासन दरबारी नोंद होत असते. सातत्याने २२ वर्षे हा ग्रंथ महोत्सव होणे अत्यंत अल्प खर्चामध्ये हा ग्रंथ महोत्सव होणे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. नागेवाडी येथील पौर्णिमा साळुंखे हिची कविता विविध वाहिन्यावर तसेच युट्युब सारख्या चॅनलवर दाखवली जात आहे. याचे सर्व श्रेय ग्रंथ महोत्सवाला जाते. या ठिकाणी होणाऱ्या प्राथमिक फेरीमध्ये देखील विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र मिळणार आहे. हा ग्रंथ महोत्सव विद्यार्थी केंद्रित आहे. सध्या शहरीकरणामुळे एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत चाललेली असून विभक्त कुटुंब पद्धती झालेली आहे. त्यामुळे मुलांना नातेवाईकांकडून जे संस्कार मिळत होते. ते संस्कार विभक्त कुटुंब पद्धतीमुळे बंद झालेले दिसत आहेत. यामुळेच पुस्तकं ही आज संस्कारपीठ झालेली आहेत. चांगल्या संस्कारांच भरण पोषण पुस्तकं  ग्रंथ करत आहेत. पाल्याबरोबरच सध्या पालकांनी सुद्धा वाचन केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी जे जे निर्माण केलेले आहे ते तुम्ही वर्ग शिक्षकांकडे जमा करावे. जमा केलेल्या लेखनाचे हस्तलिखित केल्यास भविष्यात ते तुम्हाला बघायला मिळेल. म्हणून शाळांमध्ये हस्तलिखित तयार होणे गरजेचे आहे.”

           प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे म्हणाले, “कलावंताला प्रोत्साहन देणारी माणसे  समाजात असावी लागतात. त्यामध्ये तुषार पाटील आहेत. समाजाला जसा डॉक्टर,  शिक्षक, इंजिनीयर पाहिजेत तसेच कवी देखील पाहिजेत. कविता हा आत्म्याचा हुंकार असतो. काही कला उपजत असाव्या लागतात. लेखन कला काळजात असावी लागते. काळजातील कळ  कागदावर उमटते तेव्हा ती कविता होते.  स्पर्धेसाठी, बक्षीस मिळवण्यासाठी  कविता लिहू नका. तर तुम्हाला व्यक्त होण्यासाठी कविता लिहा.”                            डॉ. राजेंद्र माने यांनी प्रास्ताविक केले.प्रल्हाद पार्टे यांनी आभार  मानले.  

           ‘मला आवडलेले पुस्तक’ या निवड चाचणीमधून पुढील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. आर्यन किरण जगताप, आर्यन अर्जुन चाळके, विभावरी योगेश भोसले, नेहा संजय माने, आयुष नितीन सुतार, श्रेया अनिल सुतार, मनस्वी महेश देशमुख, यशराज आप्पा हेगडे,  वैष्णवी रामचंद्र गोसावी, प्रियांका गोपीनाथ मारकड, वेदांतिका दत्तात्रय सोनवले, मानसी भरत मतकर, रशिता हिंदुराव मोरे, दिक्षा राजाराम अहिरे, संजना अनिल दाणे, दिपाली लक्ष्मण माने या १६ विद्यार्थ्यांची आगामी सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सवामध्ये सादरीकरण करण्यासाठी निवड झालेली आहे. त्यांचे परीक्षण प्रा.शुभांगी हणमंतराव पोळ व प्रा. संगीता गुलाबराव बर्गे यांनी केले.याबद्धल प्रातिनिधिक स्वरूपात मानसी मतकार हिचा सत्कार नागेवाडी येथे झालेल्या कार्यक्रमात शिरीष चिटणीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तेव्हा अनिल वीर,रामचंद्र जाधव, मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षकेत्त्तर कर्मचारीवृंद व अध्ययनार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here