ग्रामपंचायतीचा कारभार हुकूमशाही पद्धतीने सुरू ; सर्व सामान्य जनता जातेय भरडली – प्रदिप विधाते

0

पत्रकार परिषदेत संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करणार असल्याचा दिला सज्जड इशारा

खटाव –

         सत्ताधाऱ्यांनी सत्तेवर आल्यापासून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मनमानी, दडपशाही व हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरू केला आहे. यात सुधारणा झाली नाही तर पिंपळेश्वर संघटनेला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल असा सज्जड इशारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी विरोधकांना पत्रकार परिषदेत दिला. पत्रकार परिषदेत विधाते म्हणाले गेल्या साडेतीन वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतरण झालं. सत्ताधाऱ्यांनी केलेल्या विधायक कामामध्ये नेहमीच आमची सहकार्याची भूमिका सातत्याने राहिली आहे. गावामध्ये वीस वर्ष ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक विकास कामे मार्गी लावली. खटाव ग्रामपंचायतची भव्य इमारत , येरळा नदीवरील पूल ,  पाणीपुरवठा योजना आणि नुकतेच खटाव येथे तब्बल 25 कोटी रुपयांची सरकारी दवाखान्याची इमारत सुरू आहे .गावामध्ये तीस वर्ष पिंपळेश्वर संघटना काम करत आहे. संस्कार ,विचार, आणि विकास महत्त्वाचा मानून संघटना काम करीत आहे. विरोधाला विरोध न करता गावचा विकास महत्त्वाचा ही भूमिका घेऊन काम करत आहे.  दुर्दैवाने या गावात आम्ही विरोध करीत नाही म्हणून आपण काहीही केलं तरी चालतं अशी सत्ताधाऱ्यांची भूमिका झाली आहे .त्यातून खटाव मधील सामान्य लोकांची गळचेपी करण्यास सुरुवात सत्याधरणी केली आहे . सुरुवातीला आम्ही दुर्लक्ष केलं . आम्ही दुर्लक्ष केलं म्हणजे सत्ताधाऱ्यांना असं वाटतंय की आपल्याला कोणी विचारणार नाही असा त्यांचा गैरसमज झाला. गावांमध्ये दडपशाही हुकुमशाहीचे वातावरण तयार करण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे .गावांमधील मूलभूत समस्या कडे ग्रामपंचायतीचे लक्ष नाही. गावामध्ये पंधरा दिवस पाणी येत नाही. स्वच्छतेची ऐसी तैसी आहे. सीसीटीव्ही यंत्रणा तीन वर्ष बंद आहे त्यामुळे गुन्हेगारी कृत्य घडलेली आहेत. परंतु सत्ताधारी सत्तेच्या मस्तीत आहे धुंदीत आहेत. आम्ही काही केलं तरी मतदारांना आम्हाला चांगलं जिंकता येतं हि भावना त्यांची झालेली आहे. परंतु आता संघटना गप्प बसणार नाही. सर्व सामान्य जनतेला नाहक त्रास दिला गेला तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू व आपणास जाब  विचारू अशा इशारा त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला. 

              पुढे ते म्हणाले गावातील शास्त्रीनगर हे विस्तारित गावठाण आहे. तत्कालीन लाभार्थ्यांना प्लॉट पाडून ते रीतसर ताब्यात दिले होते. या प्लॉटमध्ये काहींनी घरे बांधली, तर काही मोकळे आहेत. काहींनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अधिकाराचा वापर करून या प्लॉटचा व्यवसाय मांडून लोकांची अडवणूक करून आर्थिक कोंडी केली जात असल्याचं यावेळी विधाते यांनी सांगितले .

           पुढे ते म्हणाले मागिल दोन ते तीन महिन्यांपासून  या गावचे ज्येष्ठ नागरिक रियाज शिकलगार यांना ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारामुळे खूप मोठा त्रास सहन करावा लागला आहे ‌. कित्येक वर्षांपासून कब्जा असून कराच्या पावत्या देखील आहेत व कब्जेपट्टीच्या व गाव नमुना आठ अ आधारे त्यांचा २०१० रोजी प्लॉट रीतसर नोंद होऊनही सद्यःस्थितीत ग्रामपंचायतीने बांधकामाबाबत अडवणूक करून त्यांना सतत हेलपाटे मारायला लावल्याने त्यांना मानसिक व शारीरिक त्रास झाला. त्यांना अचानक हृदयविकाराचा धक्का आल्याने आज ते रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. या पद्धतीची पाच प्रकरणे गावात सुरू असून, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी , तहसीलदार व बीडीओ यांच्याकडे याबाबत लिखीत अर्जाद्वारे दाद मागितल्याचे त्यांनी सांगितले.तसेच सदर ग्रामपंचायत ही आमदारांच्या गावची ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते म्हणून आमदारांनी ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारात लक्ष घालण्याची लक्षवेधी सूचना विधाते यांनी यावेळी मांडली. तसेच यावेळी बाधीत कुटुंबियातील सदस्य व रियाज शिकलगार यांचे चिरंजीव यांना भावना अनावर झाल्या व ते माध्यमांसमोर म्हणाले की आमचे सर्व प्रकरण कायदेशीर व रितसर आहे.माझ्या वडीलांच्या प्रकृतीचे काही काही बरेवाईट झाले तर याबाबतीत संबंधितांना व ग्रामपंचायतीला जबाबदार घरले जाईल.

          पेठेतील रस्त्याबाबत विधाते म्हणाले, कोणत्याही विकासकामाचे आमच्याकडून नेहमी कौतुक व स्वागत होईल.  परंतु रस्त्याचे रुंदीकरण हे शासनाच्या नियमानुसार व कायद्याच्या नियमांचे पालन करून होणं अपेक्षित आहे . नक्की त्याच पद्धतीने कामकाज होत आहे का यावर आमच कटाक्षाने लक्ष राहणार आहे.या बाबत कोणीही नाहक भीती बाळगू नये. यावेळी पत्रकार परिषदेसाठी खटाव व परिसरातील पत्रकार व पिंपळश्वेर संघटनेचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.आभार संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक रसुलभाई मुल्ला यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here