उंडाळे : गॅसची गळती झाल्यामुळे सिलिंडरचा स्फोट होऊन तेरावर्षीय मुलगा जागीच ठार झाला. उंडाळे (ता. कऱ्हाड) येथे सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गॅस सिलिंडरचा स्फोट एवढा भीषण होता की, स्फोटामुळे पत्र्याचे शेड पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.
तसेच मोठ्या आवाजाने परिसरही हादरून गेला.
अंकित श्री गोविंद सिंग (१३, मूळ रा. बिहार, सध्या रा. उंडाळे) असे दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. उंडाळे येथे काही परप्रांतीय कुटुंबे वास्तव्यास आहेत. संबंधित कुटुंबे मूळची बिहार राज्यातील असून, उंडाळे येथे उपजीविकेसाठी ते वास्तव्यास आहेत. त्या ठिकाणी एका पत्र्याच्या शेडमध्ये ते राहतात. शेडमध्येच आइस्क्रीम तयार करून त्याची विक्री ते परिसरामध्ये करीत असतात. या कुटुंबांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या मूळ गावाहून अंकित या तेरावर्षीय मुलाला कामासाठी उंडाळे येथे आणले होते. इतर कुटुंबीयांसमवेत संबंधित मुलगा काम करीत होता.
सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अंकित हा शेडनजीक अंघोळ करीत होता. त्यावेळी शेडमध्ये असलेल्या गॅस सिलिंडरच्या टाकीचा भीषण स्फोट झाला. या स्फोटाने तसेच टाकीचे तुकडे लागल्यामुळे अंकितचा जागीच मृत्यू झाला. मोठा आवाज झाल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी त्या ठिकाणी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत संबंधित मुलाचा मृत्यू झाला होता. तसेच साहित्य इतरत्र विखुरले होते.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर कऱ्हाड ग्रामीण पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. गॅसगळतीमुळे हा स्फोट झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. याबाबतची नोंद कऱ्हाड ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली आहे. सहायक फौजदार एस. जी. जाधव तपास करीत आहेत.