प्रतापगङ प्रतिनिधी (राजेश सोंडकर) :
पंचायत समिती महाबळेश्वर शिक्षण विभाग व प्राथमिक शिक्षक वाचनालय महाबळेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने महावाचन उत्सव २०२४ अंतर्गत विद्यार्थी स्पर्धा व पुस्तक प्रदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमास महाबळेश्वर तालुक्याचे गटविकास अधिकारी अरुण मरभळ, सहा.गटविकास अधिकारी सुनील पारठे, गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे, विस्तार अधिकारी सुनील चिकणे व विठ्ठल पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाबळेश्वर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी तिसरी ते बारावी तीन गटांमध्ये विभागणी करून महावाचन उत्सव अंतर्गत वाचलेल्या व भावलेल्या पुस्तकाचे परीक्षण एक ते दोन मिनिटांत अभिव्यक्त करणे व त्या पुस्तकाविषयी स्वहस्ताक्षरात परिचय करून देणे अशा वैचारिक आणि आगळ्या वेगळ्या स्पर्धेचे तसेच वाचनालयातील पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले.सर्वप्रथम केंद्रस्तरावर स्पर्धा घेण्यात आल्या. यातील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकांना आज महाबळेश्वर येथे सदर स्पर्धेच्या अनुषंगाने आमंत्रित करण्यात आले. यातून तालुक्यातील प्रथम तीन क्रमांक निश्चित करणेत आले. विजेत्यांना प्रमाणपत्र व पुस्तक देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी बोलताना गटविकास अधिकारी अरुण मरभळ म्हणाले, “शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजावी, वाढावी आणि विचारशक्ती जागृत व्हावी, त्याचबरोबर मराठी साहित्याचा जागर व्हावा आणि भारताचे सुजाण नागरिक घडावेत या उदात्त हेतूने महावाचन उत्सवाचे आयोजन शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे, ही बाब कौतुकास्पद आहे”.
गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे यांनी ‘महाबळेश्वर प्राथमिक शिक्षक वाचनालयाचे संचालकांचे कौतुक करत महाबळेश्वर तालुका प्राथमिक शिक्षक वाचनालय हे राज्यासाठी दिशादर्शक ठरलेले आहे’ असे गौरवोद्गार काढले.
या प्रसंगी प्राथमिक शिक्षक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष कै. चंद्रकांत आखाडे यांचे प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले.त्यांच्या पुण्यसमृतीस अभिवादन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. नाकिंदा शाळेचे मुख्याध्यापक अकबर साहेब यांनी त्यांच्या सेवापूर्तीच्या निमित्ताने प्राथमिक शिक्षक वाचनालयास आवश्यक ते फर्निचर उपलब्ध करून दिले याबद्दल आणि सेवानिवृत्ती निमित्त सत्कार आयोजित करण्यात आला.
याप्रसंगी केंद्रप्रमुख नामदेव धनावडे, चंद्रकांत जंगम, प्राथमिक शिक्षक वाचनालयाचे अध्यक्ष व केंद्रप्रमुख दगडू ढेबे, सचिव संतोष शिंदे, सर्व संचालक तसेच शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम माने यांनी केले तर आभार दगडू ढेबे यांनी मानले.. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सतीश माने, विजय सावंत, विष्णू ढेबे, गणेश शेंडे, राजू संकपाळ, विठ्ठल सपकाळ, अंतोष सूर्यवंशी, अशोक राऊत, सरस्वती ढेबे, रुपाली कारंडे, सचिन चव्हाण, अमित कारंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.