सातारा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यभर दौऱ्यावर असणाऱ्या मनोज जरांगे पाटील jarange हे मराठ्यांची राजधानी असलेल्या सातारा शहरात शनिवारी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
सातारा शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांच्यासोबत मराठा समन्वयकांची बैठक झाली असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.
मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे, यासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण केले. यानंतर सरकारला जाग आल्यानंतर त्यांनी कुणबी दाखल्यांच्या नोंदी तपासण्याचे काम प्रत्येक जिल्ह्यात सुरू केले आहे. तसेच काही ठिकाणी हे दाखले वाटपही सुरू केले आहे.
पण, सरसकट मराठा समाजाला कुणबी दाखले मिळावेत, यासाठी जरांगे पाटलांनी सरकारला २४ डिसेंबरची मुदत दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्रभर दौरा करून मराठा समाजात जागृती करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांचा पश्चिम महाराष्ट्रात दौरा होत आहे. कराडला शुक्रवारी (ता. १७) सभा होत असून, त्यानंतर शनिवारी (ता. १८) मराठ्याच्या राजधानी असलेल्या सातारा शहरात जरांगे पाटील गरजणार आहेत.
जरांगे पाटील यांचा गुरुवारपासून सातारा जिल्ह्यात दौरा सुरू होत आहे. त्यांची पहिली सभा खटाव तालुक्यातील मायणी येथे होणार आहे. दुसरी सभा शुक्रवारी शुक्रवारी (ता. १७) कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात होणार आहे. शुक्रवारी त्यांचा कराड येथे मुक्काम आहे. शनिवारी ते सातारा, मेढा आणि वाईमध्ये सभा घेणार असल्याचा त्यांचा दौरा जाहीर झाला होता.
परंतु सातारामध्ये सभा होणार का याबाबत संभ्रम होता. सभेच्या नियोजनावरून समन्वयकांमध्ये संभ्रम असल्याने साताऱ्यात बैठक झाली होती. त्यानंतर शनिवारीऐवजी डिसेंबरमध्ये सभा घेण्यात येणार असल्याचे काही समन्वयकांकडून सांगण्यात आले होते. परंतु आज सभेचे नियोजन करणाऱ्या समन्वयकांनी दुपारी पोलिस अधीक्षक समीर शेख यांची भेट घेतली.
शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर जरांगे पाटील नागरिकांशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी अधीक्षकांना सांगितले. त्यानंतर अधीक्षकांना सभेची परवानगी मागणारे पत्रही देण्यात आले आहे. सायंकाळी शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांच्यासोबत समन्वयकांची बैठक झाली. त्यानंतर नागरिकांनी मोठ्यासंख्येने शनिवारी सकाळी दहा वाजता पोवई नाक्यावर उपस्थित राहावे, असे आवाहन करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत होत्या. त्यामुळे सभेच्या बंदोबस्ताचे पोलिसांनी नियोजन सुरू केले आहे. सातारच्या सभेनंतर मेढा व वाई येथे जरांगे पाटील यांच्या सभा होणार आहेत.