प्रतापगङ:
पर्यावरणीय शाश्वततेच्या नाविन्यपूर्ण दृष्टीकोनासह महत्त्वपूर्ण प्रभाव पाडण्यासाठी महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषेदेचा नवरात्रोत्सव सज्ज आहे. माझी वसुंधरा 5.0 उपक्रमांतर्गत यावर्षी प्रथमच, प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या संकल्पनेतून महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद, महाबळेश्वर प्रेमी ग्रुप व हिलदारी यांच्या संयुक्त विद्यमाने एक वेगळा आणि पर्यावरणाच्या दृष्टीने जागरूक नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला.
मागील आठ दिवस खास महिलांसाठी आयोजित जागर स्त्री शक्तीचा या उपक्रमांतर्गत करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची सांगता महाबळेश्वर हॉटेल ड्रीमलँड हॉल मध्ये प्रसिद्ध नितीन गवळी यांच्या खेळ पैठणीचा व बक्षीस वितरण समारंभ असंख्य महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला.यावेळी महाबळेश्वर नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील यांचा सपत्नीक व सुप्रसिद्ध अभिनेते होम मिनिस्टर फेम नितीन गवळी यांचा महाबळेश्वर प्रेमी ग्रुपच्या वतीने शॉल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमास शहरातील महिला वर्गाने उदंड प्रतिसाद दिल्याने कार्यक्रमास रंगत आली. महिला या बुद्धीमत्ता व कर्तुत्ववाने कुठेही कमी नसून त्यांच्या पाठीशी आपण उभे राहून त्यांना संधी देणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे तसेच केवळ घरकाम हे आजच्या स्त्रीचे क्षेत्र नसून प्रत्येक क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी महिला करित असल्याचे गौरवोद्गार उपस्थित महिलांच्या सन्मानार्थ मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी काढले. तसेच महाबळेश्वर प्रेमी ग्रुपच्या निस्वार्थी कार्याबद्दल प्रशंशा देखील केली. या कार्यक्रमास पत्रकार बांधव उपस्थित होते. खेळ पैठणीच्या खेळांतर्गत प्रथम क्रमांकाचे बक्षीस महाबळेश्वर प्रेमीची मानाची पैठणी पटकावण्याचा मान सौ. तृप्ती पार्टे यांनी पटकावला. तर उपविजेता ठरल्या जयश्री वायदंडे.
मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या संकल्पनेतून या वर्षी प्रथमच गिरिस्थान नगरपरिषदे मार्फत मिसेस वसुंधरा स्पर्धा सुद्धा या कार्यक्रमादरम्यान घेण्यात आली. त्यात मिसेस वसुंधरा होण्याचा मान सौ. रेवती कपिल बगाडे यांनी पटकावला. त्याचप्रमाणे सर्व स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ मुख्याधिकारी व महाबळेश्वर प्रेमी ग्रुप यांच्या हस्ते पार पडला. स्त्रोत्रपठन स्पर्धा विवाहित महिला गटात नवरात्र ग्रुपने तर शालेय गटात अष्टलक्ष्मी ग्रुप ने प्रथम क्रमांक मिळवला. प्रश्नमंजुषा स्पर्धेत सौ. मिनाक्षी पवार व सौ. अश्विनी शिंदे ही जोडी विजेता ठरली. रांगोळी स्पर्धेत शालेय गटात कु. ऋग्वेदी संतोष आखाडे हिने तर विवाहित महिला गटात सौ. अंजली होमकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला. अतिशय अनोखा व उत्कंठावर्धक खेळ ट्रेजर हंट मध्ये स्वराली ग्रुप विजेता ठरला. महाभोंडला निमित्ताने आकर्षक वेशभूषा स्पर्धेत सौ. रुची पल्लोड या विजेता ठरल्या. व अन्य लकी ड्रॉ निमित्ताने सर्व महिलांना खेळण्याची व बक्षीस मिळवण्याची संधी देण्यात आली.
सदर कार्यक्रमास नगरपरिषदेच्या महिला कर्मचारी वर्गाचा देखील मोठा प्रतिसाद मिळाला तसेच यावेळी उपस्थित महिलांना माझी वसुंधरा अभियानाची शपथ देण्यात आली.कार्यक्रमास संजय दस्तुरे, प्रेषित गांधी व इतर पत्रकार देखील उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्तप्रसाद जाधव,अभिषेक साळुंखे, दुर्वेश प्रभाळे, शितल येवले, वृषाली डोईफोडे, मनीष भिसे, हर्ष साळुंखे, प्रसाद साळुंखे तसेच सर्व महाबळेश्वर प्रेमी ग्रुप ने अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ.शितल येवले यांनी केले.