सातारा : मांढरदेव, ता.वाई येथील श्री.काळेश्वरी देवीच्या दानपेटीमधील रकमेची व दागिन्यांची अफरातफर करून गैरकारभार करणाऱ्या ट्रस्टच्या दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी.याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.
मांढरदेव येथील काळेश्वरी देवस्थान ट्रस्ट बरखास्त करून आजी माजी सर्व ट्रस्ट कर्मचारी व ट्रस्टीची सखोल चौकशी करण्यात यावी.श्री.काळेश्वरी देवीच्या दानपेटीतील रोख रक्कम व दागिन्यांची चोरी प्रकरणी देवस्थान ट्रस्टचा सहसचिव लक्ष्मण चोपडे,विश्वस्त चंद्रकांत मांढरे व राजेंद्र कदम या तीन आरोपींकडून रोख रक्कम व दागिने मिळून सुमारे रु. १ लाख ६४ हजार २२० एवढी रक्कम वाई पोलसांनी हस्तगत केली आहे. आरोपींना वाई न्यायालयाने ५ दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची आहे. वाई तालुक्यातील मांढरगडावरील श्री. काळूबाई देवी महाराष्ट्रसह इतर राज्यातील भक्तांचे मोठे श्रद्धास्थान आहे दरवर्षी,जानेवारी पौष पौर्णिमेला देवीची दरवर्षी वार्षिक यात्रा साजरी होत असते त्याच बरोबर दर अमावस्या, पौर्णिमा, मंगळवार व शुक्रवार रोजी हजारो भाविक मांढरगडावर देवी दर्शनासाठी गर्दी करत असतात.देवीची यात्राही साजरी होत आहे.यावर्षीही नियोजन आहे. दरम्यान, दानपेटीमधील रक्कम व दागिन्यांची चोरी उघड झाल्याने भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. सदर गुन्ह्यात सापडलेल्या आरोपींकडे वस्तूरोख रक्कम व दागिने स्वरूपात अजून लाखो रुपये किमतीचा मुद्देमाल पोलीस तपासात आढळून येत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यात अन्य नावेही पुढे आली आहेत. देवीच्या दानपेटीतील चोरीची घटना पहाता यामध्ये ट्रस्टमधील अन्य लोकांचा सहभाग असण्याची शक्यता नाकरता येत नाही. श्री. काळेश्वरी भक्तांची दुखवलेली तीव्र भावना पहाता देवस्थान ट्रस्ट व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे असे भक्तगणांमधून बोलले जात आहे. जिल्हा प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करून श्री. काळेश्वरी देवस्थान ट्रस्ट बरखास्त करून चोरी घटनेचे गांभीर्य पहाता आजी-माजी ट्रस्ट कर्मचारी व ट्रस्टीची चौकशी करण्यात यावी. अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) सातारा यांच्यावतीने जिल्ह्याध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे.सदरच्या निवेदनावर युवा जिल्हाध्यक्ष सोमनाथ धोत्रे,संतोष नलवडे, संतोष जाधव व शेखर अडागळे यांच्या स्वाक्षरी आहेत.