उरण दि 5(विठ्ठल ममताबादे )
भारताच्या इतिहासात 3 जानेवारी ही तारीख सुवर्ण अक्षरांनी अंकित आहे. कारण बहुजन, मागास व दुर्लक्षित घटकातील महिलांना सुशिक्षित करून मानव प्रवाहात सामिल करण्यासाठी, त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी,त्यांचा स्वाभिमान, अस्मिता अन् स्वातंत्र्य जागृत करून जीवन सुलभ व्हावे या उदात्त हेतूने महात्मा ज्योतिबा फुले व विद्येची आद्य देवता माता सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक विरोध झुगारुन स्त्री शिक्षणाची कवाडे उघडली.त्या काळच्या राजा महाराजांना, संस्थानिकाना जमले नाही ते ह्या दांपत्यानी महत्वाचे कार्य केले. हे उपकार महिलांनीच नव्हे तर समस्त भारतीयांनी मानले पाहिजे व त्यांची आठवण म्हणून काही अंशी समाज ॠण समजून आपणही निरपेक्षपणे काही तरी केले पाहिजे या उदात्त व निरपेक्ष हेतूने,विचाराने संग्राम तोगरे व सुमनताई संग्राम तोगरे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, म्हसा, ता.मुरबाड, जि.ठाणे येथे माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून 236 प्रकारची अंदाजे
1,40,000/- रूपये किंमतीची औषधे,सुवर्णा घागस, सरपंच संजय घागस, ग्राम पंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय पवार यांना औषध गोळ्या दान दिले.संग्राम तोगरे व सुमन संग्राम तोगरे हे उरण मधील रहिवाशी असून या दापंत्यांनी आजपर्यंत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लाखो रुपयाची औषधे गोळया मोफत वाटले आहेत. त्यांचे हे काम अनेक वर्षांपासून चालू आहे. आजही हे कार्य अखंडितपणे चालू आहे.