नाट्य चळवळीला मिळणार नवी उर्जा…
प्रतापगङ प्रतिनिधी :- तालुक्यातील नाट्य चळवळीला चालना देण्यासाठी मागील जवळपास ४५ वर्षें कार्यरत असलेल्या नाट्य शिवप्रतिष्ठान महाबळेश्वर संस्थेला धर्मादाय आयुक्त यांचे नोंदणी प्रमाणपत्र मिळाले असून संस्थेची कार्यकारिणी जाहीर झाली असून प्रथम मासीक सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या सुरुवातीला शहरासह तालुक्यातील नाट्य क्षेत्रातील दिवंगत कलाकारांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नियामक मंडळ सदस्य राजेश कुंभारदरे उपस्थित होते.
संस्थेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अध्यक्ष ज्येष्ठ नाट्यकर्मी किसनराव खामकर यांचा सत्कार महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष प्रभाकर देवकर व पंचायत समितीचे माजी सभापती विजयराज भिलारे यांच्या हस्ते करण्यात आला. आपले मनोगत व्यक्त करताना राजेश कुंभारदरे यांनी महाबळेश्वर शहरासह ग्रामीण भागात नाट्य चळवळीला चालना देण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील व नाट्य क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून महाबळेश्वरचे नाव महाराष्ट्राच्या नाट्य क्षेत्रात उज्वल करण्याची ग्वाही दिली.
जाहीर झालेल्या कार्यकारिणी मध्ये अध्यक्ष, किसनराव खामकर.उपाध्यक्ष, प्रभाकर देवकर, सचिव, अरुण शिंगरे.खजिनदार, संदीप देवकुळे व सदस्य म्हणून राजेश कुंभारदरे, विजयराज भिलारे, चिन्मय अगरकर, रणजित तांबे, गोविंद कदम, रविकांत संकपाळ, दिपक बावळेकर यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या वतीने लवकरच शालेय स्तरावर नाट्य स्पर्धेच्या माध्यमातून हौशी कलाकारांना प्रोत्साहन देऊन नाट्य चळवळीला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे विजयराज भिलारे म्हणाले. संस्थेची सभासद नोंदणी सुरू करण्यात आली असून ईच्छूकांनी लवकरात लवकर संस्थेशी संपर्क साधावा असे आवाहन किसनराव खामकर यांनी केले आहे. तालुक्यासह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संस्थेला नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्याबद्दल अभिनंदन व शुभेच्छा दिल्या आहेत.