पिंपोडे बु॥ : कोरेगाव तालुक्याच्या उत्तरेकडील नायगाव, नांदवळ आणि सोनके परिसरात बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतातील कामांचा खोळंबा झाला असून, वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होऊ लागली आहे.
सध्या या भागात रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी शेतकरी महावितरणच्या वेळापत्रकानुसार पिकांना पाणी देत आहेत. आठवड्यातून चारदा रात्रीची लाइट असते. त्यामुळे रात्री अपरात्री जीव धोक्यात घालून हातातोंडाला आलेल्या पिकातून चांगले उत्पन्न पदरात पाडून घेण्यासाठी शेतकरी मेहनत करत आहेत.
वरुण घेवडा, ज्वारी, गहू, हरभरा ही पिके चांगल्या पावसामुळे बहरली आहेत. ऊस व बागायती पिकाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. शेतात कामासाठी महिला व मजुरांची वर्दळ आहे. मात्र, मागील आठवड्यात नायगाव येथील बबन पांडुरंग बनसोडे यांच्या शेतात असणाऱ्या गोठ्यातील बैलावर रात्रीच्या वेळी अज्ञात हिंस्र श्वापदाने हल्ला करून त्याला ठार केल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेने नायगावसह सोळशी, नांदवळ व सोनके शिवारात बिबट्या आल्याची बातमी उत्तर कोरेगावमध्ये वाऱ्यासारखी पसरली. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. सोनके येथेही बिबट्याचे दर्शन घडल्याची बातमी गावात पसरली.
त्यामुळे दक्षता म्हणून ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना सावध राहण्याबाबत ध्वनिक्षेपकावरून सूचना दिली. नायगाव ग्रामपंचायतीने नोटीस बोर्डावर सूचना दिली आहे. सोळशी, नायगाव, नांदवळ व सोनकेच्या गोपालकांनी गाई चरण्यासाठी सोडणे बंद करून त्यांना गोठ्यातच चारापाण्याची सोय केली आहे; परंतु चारा संपला तरी तो आणण्यासाठी शेतात एकटे जाण्याचे धाडस होत नसल्याचे नायगावमधील वसंत धुमाळ यांनी सांगितले.
नागरिकांनी पहाटे मॉर्निंग वॉकला जाणेही बंद केले आहे. ग्रामस्थ रात्री उशिरा घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत. सोळशी ते बनवडी यादरम्यान असलेल्या डोंगररांगेत अनेक वन्य प्राण्यांचा अधिवास आहे. मात्र, पाणवठे आटू लागल्याने त्यांनी वसना नदीपात्राकडे मोर्चा वळवला आहे. यात वानरे, रानडुक्कर, लांडगा यांचा समावेश आहे. मात्र, बिबट्या आहे का नाही, हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
नायगाव येथे मृत बैलाची घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मात्र, ग्रामस्थांच्या वावरामुळे परिसरात बिबट्याचे ठसे मिळून आले नाहीत. बैलाचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर बिबट्याच्या अधिवासाबाबत सांगता येईल.
– चंद्रिका लोहार, वनरक्षक, वाठार स्टेशन.