सातारा. दि 14: राज्यस्तरीय योजना मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात सन २०२३-२४ या वर्षात ०२ देशी/संकरीत गाई किंवा ०२ म्हशींचा गट वाटप करणे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुपालकांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. विजय सावंत यांनी केले आहे.
राज्यस्तरीय योजना, मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर पहिल्या टप्प्यात सन २०२३-२४ या वर्षात जिल्ह्यामध्ये ०२ देशी/ संकरीत गाई किंवा ०२ म्हशींचा गट वाटप करणे ही योजना जिल्ह्यामध्ये सर्व प्रवर्गासाठी ५० टक्के अनुदानावर राबविण्यात येणार असून सदरचे अनुदान गाई / म्हैस गट खरेदी केल्यानंतर पहिल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यात २५ टक्के व दुसऱ्या सहा महिन्यात उर्वरित २५ टक्के याप्रमाणे लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थीस ०२ देशी किंवा संकरीत गाई गट खरेदीस ५० टक्के अनुदान रक्कम रुपये ७००००/- + विमा कमाल अनुदान ८४२५/- किंवा ०२ म्हैस गट खरेदीस ५० टक्के अनुदान रक्कम रुपये ८००००/- + विमा कमाल अनुदान ९६२९/- देय असणार आहे. या योजनेच्या शासन निर्णयानुसार गायी / म्हैस गटाची खरेदी ही शासननिर्णयानुसार गठित केलेल्या खरेदी समितीद्वारे जनावरांच्या बाजारातून लाभार्थीच्या पसंतीनुसार करणे बंधनकारक केले आहे.
योजनेचा अर्ज, अर्जासोबत सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे व योजनेच्या सविस्तर माहितीसाठी पशुधन विकास अधिकारी विस्तार संबंधित पंचायत समिती यांचेशी संपर्क साधण्यात यावा. योजनेचे परिपूर्ण अर्ज दि. १५ जून २०२३ ते १० जुलै २०२३ या कालावधीतच स्वीकारले जातील. तदनंतर येणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. असेही डॉ. सावंत यांनी कळविले आहे.