पाटण : पाटणमधील उपजिल्हा रुग्णालयाचे नामकरण ‘लोकनेते बाळासाहेब देसाई उपजिल्हा रुग्णालय, पाटण’ असे करण्यात आले असून त्याबाबतचा शासन निर्णय सोमवारी सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केला आहे.
विशेष बाब म्हणून पाटण उपजिल्हा रुग्णालयाच्या नामकरणास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिल्याने राज्याची पायाभरणी करणाऱ्या नेतृत्वाच्या पहिल्या फळीतील लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जनहितवादी कार्याचा गौरव झाला आहे.
पाटणचे ग्रामीण रुग्णालय तालुक्यातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवत होते. केवळ ३० खाटांचे असलेल्या या रुग्णालयाचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नाने याच वर्षी श्रेणीवर्धन होऊन त्यास १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला आहे.
यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पुढाकाराने २७ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला असून रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे आणि अन्य सुविधांचे काम सुरू झाले आहे.
या उपजिल्हा रुग्णालयास लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नाव दिले जावे, अशी पाटणवासीयांची अनेक वर्षांपासूनची भावना होती. मात्र, नामकरणास राजकीय स्वरूप येईल असे नाव शासकीय रुग्णालयास देऊ नये, असा निर्णय शासनाने काही वर्षांपूर्वी घेतला होता. परंतु रुग्णालयाच्या नामकरणाबाबत पाटणवासीयांच्या भावनेस न्याय देण्याची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आणि पाटणच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नामकरणाचा मार्ग मोकळा झाला.
लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी महाराष्ट्र राज्याच्या पायाभरणीत मोलाचे योगदान दिले. विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले.
यामुळे राज्याच्या शिक्षण, कृषी, महसूल, पायाभूत सुविधा आदी क्षेत्रांत अनेक मूलगामी बदल घडले. कला, क्रीडा, शिक्षण, कृषी, उद्योग, कोयना धरण असो किंवा कोयना भूकंप पुनर्वसन असो अथवा कोयना शिक्षण संस्था असो, लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी पाटण तालुका आणि सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविधांगी कार्य केले.
त्यांच्या या जनहितवादी कार्यामुळेच आचार्य अत्रे यांच्यासारख्या शब्दप्रभू साहित्यिकाने त्यांना ‘लोकनेते’ ही उपाधी दिली आणि जनतेनेही ती उचलून धरली.
लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या या कार्याचा गौरव म्हणून पाटणच्या उपजिल्हा रुग्णालयास विशेष बाब म्हणून लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नाव देण्यास मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मान्यता दिली असून त्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाने सोमवारी शासननिर्णय जारी केला आहे.
पाटण आणि लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे अतूट नाते आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी केलेले कार्य आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे पाटणच्या उपजिल्हा रुग्णालयास त्यांचे नाव दिले जावे, अशी सर्वांचीच भावना होती.
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी रुग्णालयाच्या नामकरणास विशेष बाब म्हणून मान्यता दिली, याबद्दल त्यांना मन:पूर्वक धन्यवाद व्यक्त करतो.- ना. शंभूराज देसाई, उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री सातारा व ठाणे जिल्हा.