सातारा : येथील सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गेल्या दोन दिवसात 55 ट्रक भाज्यांची आवक झाली. पितृपंधरवड्यामुळे बहुतांश भाजीपाल्याची मागणी वाढली असून त्या तुलनेत आवक घटली आहे. त्यामुळे दरात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. परिणामी भेंडी, गवार, हिरवी मिरची, ढोबळी मिरची, काकडी, फ्लावर, शेवगा, घेवडा,मटार या भाज्यांच्या दरांमध्ये वाढ झाली आहे.
गुजरात, कर्नाटक तसेच पुणे, नाशिक, सोलापूर येथून साताऱ्यात भाजीपाल्याची आवक होत असते. इंदूर येथून गाजर, कर्नाटकातून घेवडा, मध्यप्रदेशच्या काही भागातून लसणाची आवक होते. स्थानिक भागातून झालेल्या आवकीमध्ये 400 ते 500 गोणी सातारी आले, गवार, भेंडी, टोमॅटो, पाच हजार क्रेट्स हिरवी मिरची, काकडी पाच ते सहा टेम्पो अशा प्रमाणात येत असतात.
मात्र, भाज्यांच्या आवक होण्याच्या तुलनेत मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. पितृपंधरवडयामुळे आपल्या पूर्वजांना नैवेद्य काढून देण्याची पद्धत आहे. त्याकरता बहुतांश भाज्यांचा वापर केला जातो. परिणामी भाज्यांचे दर पंधरा ते वीस टक्के वाढले आहेत. गेल्या रविवारी सातारा मार्केट यार्डमध्ये कोथिंबिरीची पन्नास हजार तर मेथीची 60000 जुड्यांची आवक झाली. बाजारामध्ये कोथिंबीर गड्डी 15 ते 25 रुपये तर मेथी गड्डी 12 ते 18 रुपये असा दर होता. शेपू सहा ते आठ रुपये, कांद्याची पात चार ते दहा रुपये, चाकवत सहा ते दहा रुपये, अंबाडी सात ते दहा रुपये, चवळी सात ते दहा रुपये, पालक 18 ते 20 रुपयाचा पावशेरचा दर होता.