सातारा/अनिल वीर : क्षेत्र माहुली येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयामध्ये राष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना श्रीमती राजश्री शिर्के यांचा कथ्थक नृत्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
“एक भारत श्रेष्ठ भारत” आणि “हेरिटेज क्लब” कार्यक्रमाच्या अंतर्गत नवोदय विद्यालय समिती नोएडा, नवी दिल्ली यांच्याकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. “स्पीक मॅके” ही संस्था विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना व कौशल्यांना विकसित व प्रोत्साहित करण्याचे काम करते. या प्रायोजित कार्यक्रमांमध्ये प्रसिद्ध नृत्यांगना श्रीमती राजश्री शिर्के यांना साथ देण्यासाठी त्यांच्या शिष्य कुमारी शर्वरी वैद्य व कुमारी अवंती घोशल यांची भूमिका महत्त्वाची ठरली तसेच तबलावादक अनिरुद्ध शिर्के व हार्मोनियम वादक श्री सचिन मोरे यांचेही सहकार्य लाभले.कथ्थक नृत्याच्या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कलेविषयी असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देत अभ्यासपूर्ण माहिती श्रीमती राजश्री शिर्के यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री ए. पी. सिंह यांनी केले. प्रभारी प्राचार्यांच्या हस्ते सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाच्या संगीत शिक्षिका श्रीमती माधुरी पुराणिक व सर्व शिक्षकांची भूमिका निर्णायक ठरली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी सई पाटील व आश्लेषा बारशिंग यांनी केले.डी. एन. माने यांनी आभारप्रदर्शन केले.