पुरोगामी महाराष्ट्राचा जात्यांध आणि धर्मांध बनणारा चेहरा चिंतेची बाब : प्रा. डॉ .शरद गायकवाड

0

 

अनिल वीर सातारा :  फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र अलीकडच्या काळात जात्यांध आणि धर्मांध बनवला जातोय अशी चिंता प्रा. डॉ. शरद गायकवाड यांनी व्यक्त केली. भोर येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणा नुकत्याच संपन्न झालेल्या दहाव्या फुले, शाहू , आंबेडकर विचार -प्रसार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून डॉ.शरद गायकवाड बोलत होते. उद्घाटन सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांचे हस्ते संपन्न झाले.

      डॉ.शरद गायकवाड म्हणाले, “सध्याच्या राजकारणातून नैतिकता, निष्ठा, वैचारिक भूमिका संपुष्टात आली असून भारतीय संविधानाने या देशाचे प्राचीन नाव ‘भारत’ हे पुढे अधिकृतरित्या संविधानिक स्वरूपात सर्वमान्य केलेले आहे. असे असताना देखील भारताला ‘भारत’ न म्हणता हिंदुस्थान संबोधने  ही संवेदनाशी राजकीय प्रतारणाच नव्हे तर बेईमानी आहे. भारताचा जसा हिंदुस्तान केला जातोय तसाच पुरोगामी महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्राला जात्यांध – धर्मांध बनवण्यासाठी काही प्रतिगामी शक्तींकडून आटापिटा केला जातोय. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही धोक्यात आली असून लोकशाहीची जागा एकाधिकारशाही म्हणजेच हुकूमशाही घेत आहे.समाजवाद, धर्मनिरपेक्षता कमकुवत बनवून जातीयवादाचा अदृश्य व्हायरस सध्या देशाला पोखरायला लागलेला आहे. संसद न्यायपालिका प्रशासन आणि प्रसारमाध्यमे हे लोकशाहीचे चार भक्कम आधारस्तंभ अलीकडच्या काळात डळमळीत केले जात असून  त्या विरोधात साहित्यिक आणि प्रसारमाध्यमांनी आपली वाणी आणि लेखणीची धार अधिक टोकदार करून सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवायला हवा.वाढते दारिद्र्य, वाढती लोकसंख्या, प्रचंड बेकारी, बोकाळलेला भ्रष्टाचार आणि शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी श्रमजीवी, दिन-दलित यांच्यावर होणारे अन्याय- अत्याचार याविरुद्ध सामाजिक परिवर्तन चळवळींनी, कामगार चळवळींनी संघटितपणे लोकशाही मार्गाने सत्ताधाऱ्यांना जाब विचारायला हवा.”

       

ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार उत्तम कांबळे यांच्या हस्ते माजी ऊर्जामंत्री व आमदार डॉ. नितीन राऊत, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नातू डॉ.अनिल पाटील आणि छत्रपती संभाजी नगर येथील मिलिंद महाविद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती- डॉ. वैशाली प्रधान तसेच लक्ष्मण भांगे या मान्यवरांना विशेष राष्ट्रीय पुरस्काराने स्मृतीचिन्ह, मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ.गोरेगावकर यांनी अनेक ठरावांचे वाचन करून सभागृहात उपस्थित श्रोत्यांकडून ठरावांना मंजुरी घेतली.परभणी येथील दलित अत्याचाराच्या घटनेचा संमेलनामध्ये जाहीर निषेध करण्यात आला.आभार डॉ .प्रदीप पाटील यांनी मानले.

 

रयत शिक्षण संस्थेचे व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे  प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य -डॉ. सुनील मोरे,वाडिया कॉलेजच्या प्राचार्य- डॉ. वृषाली रणधीर, प्राचार्य- डॉ. मेघना भोसले, उंब्रज कॉलेजचे प्राचार्य- डॉ.संजय कांबळे ,प्राचार्य डॉ. प्रकाश पवार ,वाई कॉलेजचे प्राचार्य- डॉ.गुरुनाथ भगरे , हडपसर कॉलेजचे प्राचार्य -डॉ. प्रमोद धिवार ,येरवडा कॉलेजचे प्राचार्य- डॉ. गौतम बनसोडे, वाई येथील आंबेडकरवादी लेखक सतीश कुलकर्णी आदी मान्यवरांनी आपापली मनोगते व्यक्त केली.मुंबई येथील शिरीष पवार आणि भीम कलाकारांचा ‘संविधान जागर’ हा ‘आंबेडकरी जलसा’ सादर करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. रोहिदास जाधव ,आनंद जाधव आदींनी अथक असे परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here