पुसेगाव : प. पू. श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेनिमित्त बुधवार २७ डिसेंबर ते ३ जानेवारी या कालावधीत श्री गुरुचरित्र व श्री सेवागिरी विजयामृत ग्रंथ पारायण सोहळा, अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला असल्याची माहिती मठाधिपती प. पू सुंदरगिरी महाराज व देवस्थान ट्रस्टचे चेअरमन रणधीर जाधव यांनी दिली.
ट्रस्टचे चेअरमन रणधीर जाधव यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून सप्ताहाची सुरुवात होणार आहे. विश्वस्त व माजी चेअरमन डॉ. सुरेश जाधव यांच्या हस्ते ग्रंथपूजन, विश्वस्त व माजी चेअरमन बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, विश्वस्त संतोष वाघ यांच्या हस्ते वीणा पूजन, विश्वस्त सचिन देशमुख यांच्या हस्ते व्यासपीठ पूजन, तर विश्वस्त गौरव जाधव यांच्या हस्ते कलश पूजन करण्यात येणार आहे.
सप्ताहात सायंकाळी ७ ते ९ या वेळेत २७ रोजी ह. भ. प. नंदकिशोर पवार (निमसाखर), २८ रोजी चैतन्य पाडळे (रामवाडी), २९ रोजी अविनाश जावलीकर, ३० रोजी प्रवीण शेलार (आंबेघर), ३१ रोजी सुरेश सुळ (अकलूज), १ जानेवारी रोजी दयानंद महाराज कोरेगावकर, २ रोजी माधव रसाळ (पुणे), बुधवार ३ रोजी सकाळी ९ ते ११ या कालावधीत रामायणाचार्य व भागवत कथाकारे माधव महाराजांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. मंगळवार २ जानेवारी रोजी दुपारी ४ ते ६ या वेळेत दिंडी सोहळा होणार आहे.
दरम्यान, राजापूर, बुध, वेटणे, नागनाथवाडी, नेर, रणसिंगवाडी, थावडदरे, वर्धनगड पंचक्रोशी व पुसेगाव येथील भजनी मंडळांचा रात्री ११ नंतर जागर कार्यक्रम होणार आहे. सप्ताहात गुरुकुल अध्यापक स्वानंद महाराज व श्री सेवागिरी महाराज गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी सहकार्य करणार आहेत. या सप्ताहात रोज पहाटे ४ ते ६ काकड आरती, सकाळी ८ ते ११ श्री गुरुचरित्र ग्रंथ वाचन, दुपारी ३ ते ५ श्री सेवागिरी विजयामृत ग्रंथ वाचन, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, कीर्तन, महाप्रसाद व जागर असे कार्यक्रम होणार असल्याचे चेअरमन रणधीर जाधव व सर्व विश्वस्तांनी सांगितले.