सातारा : ‘ सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ‘ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नायनाट करणे हे आपले कर्तव्य आहे असे पोलीस दल मानते. या ब्रीदवाक्याशी प्रामाणिक राहून सेवा बजावणारे अधिकारी , कर्मचारी अजून तरी मोठ्या प्रमाणात आहेत. लाचखोरी, हप्तेबाजी, वशिलेबाजी अशा अनेक कारणांनी पोलीस खाते बदनाम झाले आहे यात शंकाच नाही; पण तरीही कायदा सुव्यवस्था राखण्यासाठ, सामाजिक – धार्मिक सलोखा राखण्यासाठी, दंगली, जाळपोळ, दगडफेक, लुटालूट अशा प्रसंगी असेल किंवा अतिरेकी हल्ले असतील, आया बहिणींची सुरक्षितता असेल अशावेळी सर्वसामान्य माणसासाठी पोलीस हाच मोठा आधार असतो. वेळप्रसंगी जीव धोक्यात घालून पोलीस आपले कर्तव्य बजावत असतात. आपल्याला सण उत्सव आनंदात साजरे करता यावेत यासाठी ते रात्रंदिवस , उन्हातान्हात कर्तव्य बजावत असतात. अशावेळी त्यांना ना अन्नपाणी मिळते ना कौटुंबिक सुख. ना राहण्याची धड सोय ना ड्युटीचे बंधन…त्यामुळे त्यांचा योग्य तो सन्मान ठेवलाच पाहिजे. फारतर त्यांनी वाईट मार्गाला न जाता , आपल्या वर्दीला जागून अधिक चांगल्या पद्धतीने कर्तव्य पार पाडावे, वर्दीचा आदरयुक्त दरारा वाटेल असे वागावे अशी अपेक्षा आपण नक्कीच करू शकतो.
पोलीस प्रशासन हे सरकार आणि जनता यांच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. त्याची नितांत गरज आहे. सीमेवर जसे आपले जवान रात्रंदिवस जागता पहारा देत असतात म्हणून आपण सुखाची झोप घेऊ शकतो तीच भूमिका पोलीस बांधव आपल्या दैनंदिन जीवनात बजावत असतात. पण, गेल्या काही वर्षांत राजकारणी लोकांनी आणि विशेषतः जो कोणी ज्या वेळी सत्ताधारी असेल त्यांनी पोलिसांना आपले बटिक बनवले आहे. सोईनुसार त्यांना आपल्या तालावर नाचवले जात आहे.
आपल्या फायद्यासाठी त्यांचा वापर केला जात आहे. कधी कधी तर पोलीस हा खरोखरच ‘ पोलीस ‘ आहे की राजकारण्यांचा ‘ गुलाम ‘ अशी शंका यावी इतकी वाईट परिस्थिती दिसून येते. काही ठिकाणी तर त्यांना घरगडी केलेले दिसते. ( मोठमोठे पोलीस अधिकारी , त्यांचे कुटुंब तळातल्या कर्मचाऱ्यांना घरगडी समजून त्यांच्याकडून कामे करून घेतात, त्यांना उर्मट वागणूक देतात याची खंत वाटते.)
मुळात पोलिसांचे काम काय आहे, त्यांचे अधिकार, त्यांची कर्तव्य काय आहेत हे स्वतः पोलीस न ठरवता राजकारणी नेतेमंडळी, त्यांचे सगेसोयरे, त्यांचे चमचे हेच ठरवू लागले आहेत. लोकांच्या रक्षणासाठी पोलीस असताना त्यांच्या नेमणुका मंत्री, संत्री, सर्वपक्षीय पुढारी यांच्या संरक्षणासाठी केल्या जातात. खरं तर संरक्षण हा विषय राहिलेला नाहीच ; खोट्या प्रतिष्ठेसाठी पोलीस संरक्षण लागते. मागेपुढे हत्यारबंद पोलीस कर्मचारी, चार चार सायरन वाजवत जाणाऱ्या गाड्या असल्या की आपण फार मोठे झालो, काहीतरी प्रचंड कर्तृत्व, पराक्रम गाजवला असे त्यांना वाटते. आचार विचार चांगले असतील, नसत्या उठाठेवी, भानगडी नसतील तर कशाला कोण त्यांना मरतोय? पण आपले महत्व वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्य करायची, वर्तणूक करायची, चमकेशगिरी करायची आणि पोलीस संरक्षण मिळवायचे. ते मिळाले की गुर्मी, दादागिरी आणखीनच वाढते. एकीकडे पोलीस कर्मचारी, अधिकारी कमी आहेत म्हणून ओरडायचे आणि आहेत त्यातले बरेचसे गरज नसलेल्यांच्यासाठी राबवायचे. ज्यांना संरक्षण आवश्यक आहे तिथेही गरजेपेक्षा जास्त पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात असतात. त्यांना पुन्हा मूळ प्रवाहात आणले तर जनतेच्या भल्याचे ठरेल.