सातारा : सातारा जिल्ह्यातील महत्वाचा किल्ला असलेल्या प्रतापगडला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून दहा कोटींचा विशेष आराखडा तयार केला आहे. त्याचे काम जानेवारीमध्ये सुरु होणार असून या किल्ल्याचे ऐतिहासिक वैभव परत मिळवून दिले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
प्रतापगड किल्ल्याच्या Pratapgad Fort दुरुस्तीबाबत प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहिती देताना जिल्हाधिकारी डुडी Jitendra Dudi म्हणाले, सर्वात महत्वाचा व ऐतिहासिक किल्ला असलेल्या प्रतापगडची डागडुजी करण्यासाठी नवीन आराखडा तयार करण्यात आला आहे. पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार नियोजन समितीतून पुरातत्व विभागासाठी दहा कोटी मंजूर होते.
यातून यावर्षी इतर कोणतेही काम या निधीतून न करता ऐतिहासिक प्रतापगड किल्लयाच्या दुरुस्तीसाठी हा निधी वापरला जाणार आहे. त्यासाठी विशेष आराखडा तयार करुन त्याला गतवैभव प्राप्त करुन दिले जाणार आहेत. त्यासाठी या दहा कोटींच्या मंजूर निधीतून टेंडर काढण्यात आले आहे. त्याला प्रशासकिय मान्यताही दिली आहे.
येत्या जानेवारी महिन्यापासून काम सुरु होईल. यामध्ये किल्ल्याची संरक्षक भिंत, मुख्य दरवाजा, पायऱ्यांची दुरुस्ती केली जाईल. जुन्या किल्ल्याप्रमाणे रुप दिले जाणार आहे. तसेच येथील चार तलावांचे नुतनीकरण केले जाईल. यामध्ये तलावातील गाळ काढून त्याची क्षमता वाढविली जाणार असून जेणे करुन तेथे पाणीसाठा वाढेल.
लोकांना लागणारे पाण्यासाठी जलजीवन मिशनमधून पाणी देणार असून २४ तास विज कनेक्शन दिले जाणार आहे. मुलभूत सुविधा तेथील लोकांना मिळाव्यात हा त्या मागचा उद्देश आहे. तसेच प्रतापगड किल्ल्याला गतवैभव निर्माण करुन दिले जाणार आहे.
मे अखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल. तसेच प्रतापगडला जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती व रुंदीकरणही केले जाणार आहे. तापोळ्याप्रमाणे वनविभागाची मान्यता घेऊन या ही रस्त्याचे रुंदीकरण केले जाईल, असेही डुडी यांनी सांगितले.