प्रत्येक नागरिकाने आर्थिक साक्षर झाले पाहिजे :- लक्ष्मीकांत कत्ती

0

कडेगांव दि. 21(प्रतिनिधी) : प्रत्येक व्यक्ती नोकरी किंवा व्यवसाय  पैसा कमविण्यासाठी करीत असतो. पण कमावलेला पैसा कोठे आणि कसा खर्च करायचा हेच कळत नाही त्यामुळे पैसा कमवून सुध्दा आर्थिक समस्या जाणवते. ही आर्थिक समस्या दूर करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आर्थिक साक्षर झाला पाहिजे असे प्रतिपादन सांगली जिल्हा आर्थिक साक्षरता सेंटरचे सल्लागार  मा. लक्ष्मीकांत कत्ती यांनी केले. 

              ते आर्ट्स अँड कामर्स कॉलेज, कडेपूर येथे कॉमर्स विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या, “आर्थिक साक्षरता काळाची गरज” या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूराव पवार हे होते. प्रारंभी कॉमर्स विभाग प्रमुख प्रा.डॉ. आशा सावंत यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करुन सांगितला. यावेळी नॅक समन्वयक प्रा. दिलीप पवार उपस्थित होते.

               भारतातील 90% लोकांना   पैसा कुठे व किती खर्च करावा हे समजत नाही. आपल्या गरजा किती व आपण निरर्थक खर्च किती करतो याचे ज्ञान व नियोजन नसल्यामुळे लाखो रुपये कमवून देखील त्यांना कमी पडतात याचे प्रमुख कारण म्हणजे आर्थिक निरक्षरता होय, असे सांगून ते शेवटी म्हणाले की, आपण कमविलेल्या पैशाचे व्यवस्थित व्यवस्थापन करीत नाही तोपर्यंत आर्थिक सुबत्ता येणार नाही. म्हणून प्रत्येक नागरिकाने आर्थिक साक्षर बनले पाहिजे असेही ते शेवटी म्हणाले.

                यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना प्राचार्य डॉ. बापूराव पवार म्हणाले की, आर्थिक साक्षरता म्हणजे आपण कमविलेल्या पैशाचा वापर कुठे व कसा करायचा याविषयीचे सखोल ज्ञान म्हणजेच आर्थिक साक्षरता होय.

आपल्या कमविलेल्या पैशाची योग्य पद्धतीने गुंतवणूक करणे म्हणजे आर्थिक साक्षरता होय. प्रारंभी प्राचार्य डॉ. बापूराव पवार यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.स्वाती चव्हाण यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. डॉ. जयदीप दिक्षित यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here