महाबळेश्वर प्रतिनिधी : प्राथमिक शिक्षक सहकारी बँक सातारा यांच्या महाबळेश्वर शाखेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सभासद, ठेवीदार आणि महिला शिक्षकांसाठी महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला पाचगणी नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी कराडकर, महाबळेश्वरच्या तहसीलदार सौ. तेजस्विनी खोचरे पाटील, महाबी फाउंडेशनच्या संस्थापिका व वकील सौ. रेणुका ओंबळे, महाबळेश्वरचे गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे, प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे संचालक संजय संकपाळ, प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष सुरेंद्र भिलारे, केंद्रप्रमुख संजय पार्टेसर, वरिष्ठ मुख्याध्यापक जनार्दन कदम आणि शाखाधिकारी विलास वाडकर, कुरेशी मॅडम हे मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलताना सौ. लक्ष्मी कराडकर म्हणाल्या, “महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणासाठी महिलांनी स्वतःहून पुढे येऊन आत्मविश्वासपूर्ण काम करत राहिले पाहिजे. समाजात महिलांना मानसन्मान मिळत आहे, तो अधिक कसा वाढेल याकडे लक्ष द्यावे.” गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे यांनी महिलांना शुभेच्छा देत समाज परिवर्तनासाठी महिलांनी पुढे येऊन सर्वच क्षेत्रात काम करणे अपेक्षित असल्याचे आवाहन केले.
संचालक संजय संकपाळ यांनी बँकेच्या विविध योजनांची माहिती दिली आणि नवीन सभासदांना नोंदणीसाठी प्रोत्साहित केले. तसेच, बँक सभासद, ठेवीदार आणि तालुक्यातील महिला शिक्षकांना गुलाब रोप आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन आणि व्यवस्थापन महाबळेश्वर तालुका महिला आघाडी अध्यक्ष सौ. वैशाली कदम, दिपाली हिरवे, संगीता उत्तेकर, रूपाली कारंडे, अर्चना भिलारे, अर्चना कांबळे, वंदना शिंदे, निलम शेंडकर आदी महिला शिक्षकांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रईसा शेख आणि सुजाता ढेबे यांनी केले, तर सौ. सरस्वती ढेबे यांनी आभार मानले.