फलटण : सातारा जिल्ह्यातील अभियांत्रिकी शिक्षणात प्रतिष्ठेचे स्थान असलेल्या फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, फलटण महाविद्यालयाने नुकतेच राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (नॅक) कडून ‘ए ग्रेड’ प्राप्त करून जिल्ह्यात अभियांत्रिकी क्षेत्रात एक नवा इतिहास रचला आहे.
दिनांक २१ व २२ ऑक्टोबर २०२४ रोजी नॅक पिअर टीमने महाविद्यालयास भेट देऊन सखोल पाहणी केली व महाविद्यालयाच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन आज, दि. १ नोव्हेंबर रोजी ‘ए ग्रेड’ मानांकन प्रदान करण्यात आले.
या मानांकनामुळे महाविद्यालयाच्या शिक्षण आणि संशोधनाच्या गुणवत्तेला राष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त झाली आहे. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या उद्दिष्टाने विविध क्षेत्रांमध्ये केलेली प्रगती, संशोधन, आणि विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकासासाठी चालवलेल्या उपक्रमांना नॅकतर्फे गौरवण्यात आले. हे यश सातारा जिल्ह्यातील अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रेरणादायी ठरले असून, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या उत्कृष्ट शिक्षण देण्याच्या परंपरेचा ठसा या मानांकनातून अधोरेखित झाला आहे.
या यशामध्ये फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सर्व व्यवस्थापन समिती सदस्य, प्रशासन अधिकारी अरविंद निकम सर, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. नरेंद्र नार्वे यांचे मार्गदर्शन विशेषत्वाने उल्लेखनीय ठरले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आय. क्यू. ए. सी. (नॅक) समन्वयक प्रा. शांताराम काळेल तसेच सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अविरत मेहनत घेऊन नॅक समितीच्या सर्व निकषांची तयारी केली. समितीच्या अपेक्षांची पूर्तता करताना महाविद्यालयाच्या सर्व स्तरांवरील कर्मचार्यांनी समर्पणाने योगदान दिले.
फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, तसेच महाविद्यालय विकास समितीचे सदस्य भोजराज नाईक निंबाळकर, हेमंत रानडे, डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, शिरीष दोशी, शिरीष भोसले आणि प्रशासन अधिकारी अरविंद निकम यांनी या यशाबद्दल महाविद्यालयातील संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे.
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या या अभिमानास्पद यशामुळे जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण झाला असून, विद्यार्थ्यांना अद्ययावत व दर्जेदार शिक्षण देण्याच्या दृष्टीने महाविद्यालयाने घेतलेले हे पाऊल निश्चितच उल्लेखनीय आहे. या यशाच्या निमित्ताने फलटण एज्युकेशन सोसायटीच्या सर्व कार्यरत सदस्यांच्या कार्यप्रवणतेचे आणि शिक्षणाबद्दल असलेल्या तळमळीचे दर्शन घडते.