सातारा; शिवथर गावाच्या हद्दीमध्ये असणाऱ्या मानवी वसाहतीमध्ये दिवसाढवळ्या बिबट्याने एका शेळीवर हल्ला करून ठार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून शिवथर परिसरांमध्ये दोन ते तीन बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याचे आढळून आले आहे. शेतकऱ्यांची पीक काढणी आणि पेरणी यांसारखी कामे या परिसरात सुरू आहेत.
मानवी वसाहतीमध्ये बिबट्यांचा वावर असल्याने मोठा अनर्थ घडू शकतो अथवा शेतीचे काम करणारे मजूर शेतकरी यांच्यावरही बिबट्यांकडून जीवघेणा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शेतीच्या अशा कामांना भीतीपोटी मजुरांनी पाठ दाखवली आहे. वनविभागाकडून याबाबत मृत शेळीचा पंचनामा करण्यात आला आहे पंचनाम्यानंतर पुढे काय? शेतकऱ्यांना भयमुक्त करण्यासाठी प्रशासन आणि वन विभाग यांची भूमिका काय? हल्लेखोर बिबट्याला जेर बंद करणार का?