सातारा/अनिल वीर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीतर्फे भगवान गौतम बुद्ध यांच्या २५६६ व्या जयंतीनिमित्त शुक्रवार दि.५ व शनिवार दि.६ रोजी छ. शाहु महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
धम्ममय वातावरणात सातारा शहरातील विश्वरत्न महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील सांस्कृतिक सभा मंडपात विविध कार्यक्रम होणार आहेत.तेव्हा सर्व धम्मबांधव समतावादी विचारधारेच्या संघटना,संस्था,मंडळे, पक्ष, समता सैनीक दल आदी तत्सम संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते व उपासक-उपासिका यांनी सर्व कार्यक्रमास वेळेवर उपस्थित रहावे.असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
शुक्रवार दि.५ रोजी सकाळी ९ वाजता – धम्म ध्वजारोहन, धम्म वंदना व सुत्तपठण आदी सर्व विधीचे कार्यक्रम,९.३० वा. तथागतांच्या प्रतीमेची भव्य अशी रथातून मिरवणूक,सायंकाळी ६ वा.धम्म देसना होणार आहे. यावेळी श्रामनेर संघाची उपस्थिती लाभणार आहे.भन्ते दिंपकरजी व जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे श्रामनेर भागवत भोसले यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.७.३० वा.खिरदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.दरम्यान,त्रिपुडी,ता.पाटण येथे अष्टशील विहाराच्या प्रांगणात बुद्ध जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दि.६ रोजी आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त सायंकाळी ६ वाजता प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.यावेळी, “राजर्षी शाहु महाराज आणि त्यांचे समग्र विचार” या विषयावर प्रा.विक्रम कदम व्याख्यान देणार आहेत.अध्यक्षस्थान अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत भूषवणार आहेत.