भोर : शहरापासून ५ किलोमीटर अंतरावरील भाटघर धरणाच्या जवळ असलेल्या वडवाडी (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅड टेक्नॉलॉजी या महाविद्याला सोमवारी (ता.६) सायंकाळी टाळे ठोकण्यात आले.
बैंक ऑफ बडोदा बँकेने ३२ कोटी ३ लाख ९० हजार १५६ रुपयांच्या कर्जाच्या थकबाकीमुळे न्यायालयीन आदेशानुसार कॉलेजचा ताबा घेतला आहे.
कॉलेजच्या इमारती आणि १४ हेक्टर ६७ आर या क्षेत्रावर ताबा घेतला आहे. सोमवारी सायंकाळी बँकेच्या वतीने वसतीगृहातील सुमारे ८०० विद्यार्थ्यांना बाहेर काढून बँकेने सर्व मालमत्ता ताब्यात घेतली. अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या या इंजिनिअरींग अॅड टेक्नॉलॉजी कॉलेजमध्ये डिप्लोमाच्या सहा शाखांमधील १ हजार १०० विद्यार्थी, डिग्रीच्या पाट शाखांमधील ५५० विद्यार्थी आणि इंग्लिश मिडीयम स्कूलमधील सुमारे २५० विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होत आहे.
दोन महिन्यांपूर्वी बँकेचे अधिकारी ताबा घेण्यासाठी आले असता विद्यार्थ्यांनी आमचे शैक्षणीक नुकसान करू नये यासाठी आंदोलन करून मालमत्ता ताब्यात घेवू दिली नाही. परंतु सोमवारी (ता.६) सायंकाळी कॉलेज सुटल्यानंतर बँकेने ही कारवाई केली. बँकेने मालमत्ता सील करून चोवीस तास सुरक्षारक्षक ठेवले आहेत. १७ जानेवारीली इंजिनिअरींगच्या परीक्षा कशा होणार आणि यापुढे शिक्षण बंद होणार या विचारामुळे काही विद्यार्थी रडत-रडत वसतीगृहाच्या बाहेर पडले.
२००९ सालापासून सुरु असलेल्या या कॉलेजमध्ये राज्याच्या खेडापाड्यातून विद्यार्थी शिक्षणासाठी आलेले आहेत. सद्यस्थितीत ४ लाख १९ हजार स्वेअरफूटाचे बांधकाम असून कॉप्युटर व इतर साहित्य मिळून सुमारे १०० कोटींची मालमत्ता आहे. अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या वडवाडी कॅपसमध्ये सध्या जमीन आणि कॉलेजच्या इमारती मिळून सुमारे १३२ कोटींची मालमत्ता आहे.
‘विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होऊ नये म्हणून कॉलेज सुरु करण्यासाठी बँक प्रशासनासोबत आमचे बोलणे सुरु आहे. सध्या आम्ही ऑनलाईन शिक्षण सुरु करणार आहोत. मात्र १७ जानेवारीला होणा-या परीक्षेपूर्वी कॉलेज सुरु होण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत’.
– राजीव जगताप, अध्यक्ष, अभिनव एज्युकेशन सोसायटी पुणे