साताऱ्यातील ‘त्या’ हत्येप्रकरणी दमानियांचा खळबळजन खुलासा
सातारा : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण पहिल्यापासून लावून धरणाऱ्या आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी आक्रमतेने मागणी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडनंतर आता सातारा जिल्ह्यातील आणखी एका धक्कादायक हत्या प्रकरणात लक्ष घातलं आहे.
गावात आपली बदनामी केल्याचा मनात राग धरून आरोपीने एका व्यक्तीला गाडीने उडवलं आणि त्यानंतर त्याच्यावर कोयत्याचे अनेक वार करत हत्या केली आहे. या हत्येचे फोटो भयंकर असून ते पाहून आपण हादरून गेल्याचं अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी म्हटलं आहे.
शिवाय 12 मार्चला ही हत्या करण्यात आली आहे. तरीही या प्रकरणातील आरोपी अजून मोकाट असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. या संपूर्ण हत्या प्रकरणाची माहिती त्यांनी आपल्या एक्स अकाउंटवर दिली आहे. एक्सवरील पोस्टमध्ये दमानिया यांनी लिहिलं की, आज पुन्हा हलून निघाले. डोकं पुन्हा सुन्न झालं.
32 वर्षीय रत्नशिव निंबाळकर राहणार अद्रकी खुर्द, तालुका फलटण, जिल्हा सातारा, या युवकाचा 12 मार्चला क्रूर पद्धतीने खून केला गेला. आई-वडील, विधवा बहीण, तिची 2 मुलं, तो व त्याची पत्नी व 2 मुलं या सगळ्यांची जबाबदारी त्याच्यावर होती. रत्नशिवची हत्या करणारा आरोपी दत्तात्रय निंबाळकर हा मिलिटरी मध्ये होता.
मात्र, त्याला तिथून काढून टाकण्यात आलं होतं असं त्याच्या गावातील लोकं सांगतात. ह्या माणसाचे लग्न झाले नव्हते आणि त्याचे एक महिलेसोबत संबंध होते. ह्या माणसाला पूर्ण गाव ‘काका’ म्हणायचं. तर माझी गावात बदनामी केली याचा राग मनात धरून आरोपी दत्तात्रयने त्याच्याच आडनावाच्या रत्नशिवचा निर्दयीपणे खून केला.
12 मार्चला बहिणीच्या मुलाला 10 वीच्या परीक्षेसाठी रत्नशिव सोडायला गेला होता. तिथून घरी येताना दत्तात्रयने त्याला गाडीने उडवलं आणि खाली पडल्यावर कोयत्याने अनेक वार केले. मात्र, तरीही आरोपी अद्याप फरार आहे. तिथल्या पत्रकारांनी बातमी देखील केली नाही कारण त्यांच्यावर ‘दबाव’ आहे. कसला दबाव ? काय हे? असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केला आहे.
शिवाय मुख्य आरोपी दत्तात्रय निंबाळकर याचा भाऊ सुरेश निंबाळकर भाजप फलटणचा सरचिटणीस आहे. भाजपला विनंती करायची आहे की तात्काळ सुरेश निंबाळकरला पदावरुन हटवावं किंवा आरोपीला अटक होईपर्यंत त्याला पदावरुन बाजूला करावं, अशा लोकांना शिक्षा झाली पाहिजे. तुम्ही कुठल्याही पक्षाचे असला तरी असं करणं चुकीचं असल्याचंही दमानिया म्हणाल्या.