भारताचा आत्मा संविधान जपण्याची गरज : जीवन सर्वोदयी 

0

अनिल वीर सातारा  : आपले संविधान  भारताचा आत्मा असून तो जपला  पाहिजे.असे मत फिरते ग्रंथालय वाचक चळवळीचे प्रवर्तक सामाजिक कार्यकर्ते जीवन इंगळे उर्फ  सर्वोदयी यांनी  व्यक्त केले. संबोधी प्रतिष्ठानच्यावतीने येथील नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये प्रतिष्ठानचे संस्थापक स्मृतीशेष विश्वस्त कॅप्टन  साहेबराव बनसोडे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा यावर्षीचा १६ वा  सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार जीवन सर्वोदयी यांना समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुनील जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.भारतीय संविधान प्रास्ताविका, स्मृतीचिन्ह, शहीद  डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे  विज्ञान प्रबोधन विचार ग्रंथ संच, शाल व बुके असे पुरस्काराचे स्वरूप होते.तेव्हा सत्कारास उत्तर देताना सर्वोदयी बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य  सुरेश खराते होते.विचारमंचावर  संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनकर झिंब्रे, उपाध्यक्ष रमेश इंजे, कार्यवाह ॲड. हौसेराव  धुमाळ, आचार्य  विनोबा भावे ट्रस्टचे विश्वस्त विजय दिवाण उपस्थित होते.

     जीवन सर्वोदयी म्हणाले, “मला मिळालेला पुरस्कार हा खऱ्या अर्थाने पुस्तकांचा व उदंड प्रतिसाद देणाऱ्या वाचकांचा आहे. महात्मा गांधी आणि आचार्य  विनोबा यांनी मला वेगळी वाट दिली. त्या आधारेच वाचक चळवळीच्या माध्यमातून   महामानवांनी दिलेला मानवता, बंधुता व समतेचा विचार  समाजात रुजवण्याचे काम निरपेक्ष भावनेने चालवले आहे. ज्ञानज्योती  सावित्रीबाई, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांचे  क्रांतिकारक विचार समाजात रुजले पाहिजेत. यासाठी मी जाणीवपूर्वक प्रयत्न वाचक चळवळीच्या माध्यमातून  करीत आहे.” अलीकडे हिटलरच्या पुस्तकांना मागणी वाढतेय हे धोकादाय  आहे. अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. 

 

सहाय्यक आयुक्त सुनील जाधव म्हणाले, “शासन आपल्या दारी प्रमाणे पुस्तक आपल्या घरी पोहोचवण्याचा उत्तम उपक्रम जीवन सर्वोदयी यांनी चालवला आहे. त्यांच्या कार्याचा उचित गौरव माझ्या हस्ते होत  आहे. हा माझा सन्मान आहे. नवीन पिढी समोर महामानवांचा विचार पोहोचवणे अत्यंत गरजेचे आहे.” प्राचार्य सुरेश खराते म्हणाले, “भारताला महान बनवण्याचा, सर्वांचे जीवन उंचावण्याचा  महामानवांचा समतेचा विचार  कुणाच्याही भावना न दुखवता  समाजासमोर  निष्ठेने रुजवण्याची गरज आहे. सध्या जाती-जातीमध्ये कलह वाढवण्याचे काम होत आहे.ही बाब  अतिशय घातक आहे. तेव्हा महापुरुषांचा खरा  वारसा पुढे घेऊन जाण्याची गरज आहे.”

   

आयुर्विमा महामंडळाचे माजी अधिकारी भास्कर फाळके यांनी संबोधी प्रतिष्ठानच्या  कार्यास मदतीचा धनादेश दिल्याबद्दल त्यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. सदरच्या कार्यक्रमास प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष  केशवराव कदम,विश्वस्त प्राचार्य संजय कांबळे, डॉ. सुवर्णा यादव, अशोक कांबळे,उत्तमराव पोळ, रमेश जाधव यांच्यासह  संस्थेचे अनेक सभासद, हिंदी साहित्यिक व दैनिक नवभारत चे माजी संपादक किशोर दिवसे, निवृत्त न्यायमूर्ती ओंकार पाटील, ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ, आंबेडकरी विचारवंत सतीश कुलकर्णी, चित्रकार चंद्रकांत ढाणे, रवींद्र झुटिंग, चंद्रकांत खंडाईत, गणेश कारंडे, प्रशांत पोतदार, दिलीप भोसले,अनिल वीर,प्रा.विलास वहागावकर,डी. एस.भोसले, अशोक कांबळे, विलास कांबळे, प्रकाश खटावकर,पल्लवी ताकसांडे,विनोद यादव,चंद्रमनी बनसोडे व त्यांच्या संपूर्ण बनसोडे परिवार,एकनाथ तेलतुंबडे यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.रमेश इंजे यांनी प्रास्ताविक केले. दिनकर झिंब्रे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. हौसेराव धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले. यशपाल बनसोडे यांनी आभार मानले.  

  प्रारंभी  रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव प्राचार्य आर.डी. गायकवाड, सातारा जिल्हा न्यायालयाचे माजी प्रबंधक मोहन काकडे, ज्येष्ठ इतिहास संशोधक मा. म. देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here