दहिवडी : तालुक्यातील आदर्श गाव लोधवडचे सुपुत्र आंतरराष्ट्रीय उद्योजक व पुणे येथील माने उद्योग समुहाचे मॅनेजिंग डायरेक्टर, थर्मोकॉलमॅन रामदास मानसिंग माने यांचा दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना उद्योजक बनविण्यासाठी प्रेरणा देणारे स्टोरी ऑफ थर्माकोल ॲन्ड थर्मोकॉलमॅन माने थर्माकोल म्युझियम हा महत्वाकांक्षी प्रकल्प दहिवडी गोंदवले रोडवर साकारतोय.
आधुनिक पद्धतीने उभारलेले हे भारतातील पहिले थर्माकोल म्युझियम असल्याची माहिती म्युझियमचे प्रमुख रामदास माने यांनी पत्रकारांना दिली.
मंगळवार, दि २४ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता माने थर्माकोल म्युझियम , रामदास माने फार्म हाऊस व श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मंगल कार्यालयलाचा शुभारंभ सिक्कीमचे माजी राज्यपाल व माजी खासदार श्रीनिवास पाटील व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी पुणे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ , माजी कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, माजी विभागीय आयुक्त व रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, इंद्रजित देशमुख एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर उपस्थित राहणार आहेत.
रामदास माने यांचे बालपण अठराविश्व दारिद्र्य असलेल्या व मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबात गेले. अशा परिस्थितीत काहीतरी करून दाखविण्याच्या जिद्दीने व त्यासाठी घेतलेल्या अविरत कष्टातून त्यांनी हे साम्राज्य निर्माण केले आहे. वेटर, वायरमन ते उद्योजक अशी प्रगती करत रामदास माने यांनी ‘माने ग्रुप ऑफ कंपनीज’च्या माध्यमातून जगभरात आपली ओळख निर्माण केली व थर्माकॉलच्या उद्योगात नाव कमावले. थर्माकॉलच्या व्यवसायात अग्रगण्य असलेल्या माने यांच्या देश-परदेशात सहा ते सात कंपन्या आहेत. त्यांनी संयुक्त अरब अमिरातीत जगातील सर्वात मोठा थर्माकॉल निर्मितीचा प्रकल्प उभा केला असून त्याची नोंद ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ नेही घेतली आहे.
‘माने थर्माकोल म्युझियम’ माण तालुक्यातील दहिवडी गोंदवले रोडवर उभारण्यात आले आहे. दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना उद्योजक बनविण्यासाठी प्रेरणा देण्याची म्युझियमची संकल्पना आहे ही तीन मजली इमारत आहे. तळमजल्यावर भोजनाची व्यवस्था, पहिल्या मजल्यावर मोठे दालने, व्यासपीठ दुसऱ्या मजल्यावर म्युझियम व व्यासपीठ आहे. त्याचबरोबर लक्झरी रुम्सस आहेत. हजारो दृष्टीभ्रम करणाऱ्या चित्र, ट्रॉफी , सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व वृत्तपत्रातील बातम्या व थर्माकोल बनवण्यासाठी लागणारे साहित्य यांच्या माध्यमातून वैज्ञानिक रितीने म्युझियमची निर्मिती करण्यात आली आहे.
हे म्युझियम होतकरू, गरिब व सर्वसामान्यांन्यासाठी आकर्षक ठरणार आहे. या म्युझियम व मंगल कार्यालयाच्या उद्घाटनासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन माने उद्योग समुहाचे मॅनेजिंग डायरेक्टर रामदास माने व सीईओ राहुल माने यांनी केले आहे.