कवलापूर : सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या चर्चेत असलेल्या कवलापूर विमानतळाची पहिली धावपट्टी सन १९६२ ला झालेल्या भारत-चीन युद्धासाठी केली गेली होती. वर्षभराचे हे काम, शेकडो हातांनी केलेल्या श्रमदानामुळे दहा दिवसांत झाले होते.
हे काम सुरू असताना विट्यातून कवलापुरात दाखल झालेले लेखक, पत्रकार धों. म. मोहिते यांनी एका पुस्तकात ‘कवलापूर विमानतळ’ या शीर्षकाखाली सविस्तर वर्णन केले आहे.
त्याकामी ‘कवलापूर विमानतळ श्रमदान समिती’ स्थापन केली होती. तिचे प्रमुख होते तत्कालीन उपमंत्री बॅ. जी. डी. पाटील, वसंतदादा पाटील आणि जिल्हा परिषदेचे सभापती ब. शि. कोरे. कवलापूर विमानतळाचे स्वप्न ताकदीने पुढे रेटताना या लेखातील संदर्भ बळ वाढवणारे आहेत. त्यातील संपादित अंश…
विटा-सांगली एसटीने कवलापूर विमातळाजवळ उतरलो. लढाई मी कधी पाहिली नाही; पण दूर पल्ल्यावरील दृश्य लढाईचे चित्र नजरेसमोर उभे करीत होतो. मोकळ्या माळरानावर राहुट्यांचा तळ, असंख्य ट्रक, ट्रॅक्टरची धावपळ, रोलरचा खडखडाट, धुराड्यातील काळ्या धुराने आभाळ व्यापलेले, वादळातून मुंग्या निघाव्यात, तसा लोकांचा जमाव.
या दंग्यात मी थोड्याच वेळात सामील झालो. कुदळ, फावडी खणत होती. बाहेरून आलेले मुरुमाचे ट्रक रिकामे होत होते. बघता-बघता मुरूम पसरला जात होता. त्यावर रोलर दाब देत होता. उंचवटे फोडून सखल भागात भराव करण्याचे काम बुलडोझर करत होते.
त्या प्रचंड माळावर तीन हजार फूट लांबीच्या आणि तीनशे फूट रुंदीच्या पट्ट्यात यंत्रे, वाहने, माणसे लाह्यांसारखी पसरली होती. सारे शिस्तीत चालले होते. त्यात भिक्षापती, लक्षापती, शेतकरी, कामगार, कारखानदार, पत्रकार, वकील, न्यायाधीश, कलेक्टर, शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, डॉक्टर, महिला, राजकारणातली डावी-उजवी आघाडी, पोलिस, पट्टेवाले, बाराबलुतेदार, माकडवाले, संत्री-मंत्री सगळे होते. सगळी मनापासून कष्ट उपसत होती.
‘फोटोसाठी श्रमदान’ प्रकरण नव्हते. त्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तोळामासा शरीरयष्टी असलेले गुप्तेसाहेब काम करीत होते. एरवी मोटारीतून फिरताना नाकात धूळ जाऊ नये म्हणून ते रुमाल बांधायचे. पण, विमानतळाचे काम करताना ते मुरूम भरून उतरू लागले.
भारताच्या उत्तर सीमेवरील ‘चौ-एन लाय’ नावाचा कुणी दांडगेश्वर राज्यकर्ता भारतभूमीवर वाकडी नजर ठेवून होता. मैत्रीच्या गप्पा मारत मारत त्याने भारताला गाफील ठेवले आणि एके दिवशी अचानक भारतावर हल्ला चढवला. हिमालयातील बर्फ पेटला, उत्तर सरहद्दीवर आगडोंब उसळला. त्याचे चटके प्रत्येक भारतीयाच्या काळजाला बसू लागले. मायभूमीच्या संरक्षणासाठी जे जे करता येणे शक्य असेल ते प्रत्येकजण करू लागला. त्याचीच प्रक्रिया म्हणजे कवलापूर विमानतळ.
कवलापूर गावाजवळ विस्तीर्ण मैदान आहे. विमान उतरण्यासाठी राखून ठेवलेले ते एक साधे मैदान. अर्थात, मोठ्या विमानांना उतरण्यासाठी ही जागा सोयीस्कर नव्हती. आता आपल्या देशातील विमानदल वाढणार असून विमानांची ये-जा वाढणार. आधुनिक विमाने आकाराने व वजनाने मोठी असल्याने त्यांना उतरण्यासाठी विस्तीर्ण व मजबूत तळ लागतो.
म्हणून कवलापूरच्या या मैदानाची सुधारणा करून त्याचा उपयोग मोठी विमाने उतरण्यासाठी करावा, असा विचार तज्ज्ञांनी केला. त्यासाठी श्रमदान समिती स्थापन झाली. लोकांना आवाहन केले. जनतेने ते स्वीकारले. श्रमदानासाठी विमानतळाकडे प्रचंड ओघ वाहू लागला.
जनताजनार्दनाची शक्ती योग्य मार्गदर्शनाखाली वापरली गेली, तरच ती सत्कारणी लागणार होती. तज्ज्ञांना हवा तसा विमानतळ तयार होणार होता. त्यासाठी जिल्हा परिषदेत वाय. ए. शिंदे, बी. अँड. सी.चे एन. व्ही. पंडित हे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरद्वयी आणि त्यांचे सहकारी डोळ्यात तेल घालून देखरेख करू लागले. कामाची वाटणी, हत्यारे, पेट्रोल, श्रमपरिहार या विभागाची जोखीम द. शं. जमदग्नी आणि मंडळींनी सांभाळली.
बंदोबस्ताला पोलिस होतेच. सरकारी यंत्रणेचा सिंहाचा वाटा होता. जनता, नेते, सरकारी यंत्रणा यांचा त्रिवेणी संगम कवलापूर विमानतळावर घडून आला. त्यामुळेच सरकारी चाकोरीतून जे काम करायला एक वर्ष लागले असते, ते काम दहाजणांच्या दहा हातांनी अवघ्या दहा दिवसांत उरकून टाकले.