सातारा : येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ माता भीमाबाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.अध्यक्षस्थानी जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे संस्कार सचिव नंदकुमार काळे होते.यावेळी ज्येष्ट सम्यक संघाचे सरचिटणीस बी.एल.माने व प्रकाश खटावकर यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव महोत्सव समितीचे कोषाध्यक्ष ऍड.हौइराव धुमाळ यांनी प्रास्ताविक केले.कार्याध्यक्ष अनिल वीर यांनी सूत्रसंचालन केले तर अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी आभारप्रदर्शन केले. प्रारंभी, डॉ.आंबेडकर पुतळ्यास सुभाष सोनावणे, बी.एल.माने व अंकुश धाइंजे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.भन्ते दिंपकर (थेरो) यांच्या अधिपत्याखाली संपूर्ण विधी पार पाडण्यात आला.सदरच्या कार्यक्रमास समितीचे उपाध्यक्ष ऍड.विलास वहागावकर,दयानंद बनसोडे, दत्तात्रय सावंत,सुरज कांबळे, जगदीश गायकवाड,विलास कांबळे,वसंत गंगावणे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
भीमाबाई रामजी आंबेडकर यांचा जन्म दि.१४ फेब्रुवारी १८५४ मध्ये आंबेटेंभे या ठिकाणी झाला होता. त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आई व सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या पत्नी होत्या. त्यांचे वडील धर्मा पंडित हे आंबेटेंभे या गावचे होते. ते मिलिटरीत असल्याने व दळणवळणाच्या गैरसोय असल्यामुळे ते मुरबाड येथे स्थलांतरित झाले. ते मराठा पलटणीत व नंतर १०६ सॅपर्स ॲंन्ड मायनर्समध्ये सुभेदार होते.
इ.स. १८६७ मध्ये वयाच्या १३ व्या वर्षी भीमाबाईंचा विवाह १९ वर्षीय रामजी सकपाळ यांच्याशी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे झाला. इ.स. १८६६ च्या सुमारात रामजी इंग्रजी सैन्याच्या १०६ सॅपर्स अँड मायनर्स तुकडीत भरती झाले होते. रामजी ज्या पलटणीत होते ती पलटन इ.स. १८८८ मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे लष्करी तळावर आली होती. येथे सुभेदार रामजींना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक पद मिळाले होते. या काळात रामजी व भीमाबाईंच्या पोटी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी महू या लष्करी छावणी असलेल्या गावी झाला.
भीमराव हे रामजी सकपाळ व आई भीमाबाई यांचे अंतिम अपत्य होते. बाळाचे नाव ‘भिवा’ असे ठेवण्यात आले. तसेच त्यांची भीम, भीमा व भीमराव ही नावेही प्रचलित झाली. आंबेडकरांचे कुटुंब हे त्याकाळी रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या गावचे होते. इ.स. १८९४ मध्ये सुभेदार रामजी सकपाळ इंग्रजी सैन्यातील मुख्याध्यापक पदाच्या नोकरीवरून निवृत्त झाले आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या मूळ गावाजवळीत दापोली या गावातील ‘कॅम्प दापोली’ वस्तीत परिवारासह राहू लागले. इ.स. १८९६ मध्ये रामजींची आपल्या कुटुंबासह दापोली सोडली व सातारा येथे राहिले.त्यावर्षीच त्यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली. इ.स. १८९६ मध्ये मस्तकशूळ या आजाराने भीमाबाईंचे निधन झाले.त्यावेळी आंबेडकर ५ वर्षाचे होते.