सातारा : विविध विभागांनी मंजूर निधी ३१ मार्चअखेर निधी खर्च करण्याबाबत नियोजन करावे. निधी अखर्चित राहिल्यास विभागप्रमुखांना जबाबदार धरण्यात येइल, असा इशारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिला आहे.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभागृहात याशनी नागराजन यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी ठराव समितीची सभा झाली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सीद, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, रोहिणी ढवळे, जिल्हा कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मोहसीन मोदी, अमर नलवडे, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, जिल्हा समाजकल्याण अधिकारी विद्यानंद चल्लावर, जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय लाड आदी उपस्थित होते.
ठराव समितीत मागील कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर विषय पत्रिकेवरील विषय चर्चेला आले. आरोग्य विभागाकडील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे इमारत, निवासस्थान बांधकाम तसेच देखभाल दुरुस्तीबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर जिल्हा परिषद पाच टक्के दिव्यांग कल्याण सेसअंतर्गत जिल्हास्तर शासकीय क्रीडा स्पर्धेचा खर्च निधी मिळण्याबाबतही चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर याच सभेत ऐनवेळीही काही विषय मांडण्यात आले. त्यावरही चर्चा करून मंजुरी देण्यात आली.नीलेश घुले यांनी विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन केले.