मकरंद पाटलांविरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी उमेदवार देणार; कोण असेल उमेदवार…?

0

वाई : विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सातारा जिल्हयात उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. यामध्ये वाई मतदारसंघात लोकसभेच्या निवडणुकीत शशिकांत शिंदेंना मिळालेल्या मतांच्या पार्श्वभूमीवर आता विधानसभेसाठी येथील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांच्या विरोधात उमेदवार देण्याची तयारी शरद पवार गटाने सुरु केली आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी झालेल्या बैठकीत वाईतील राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांनी इच्छुकांपैकी एकाच्या नावावर एकमत करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे मकरंद पाटील यांना विधानसभेची निवडणूक अडचणीची ठरणार असल्याचे चित्र आहे. निसर्ग मंगल कार्यालयात ही बैठक झाली.

लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला.पण,त्यांना वाई आणि पाटणमधून महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यापेक्षा जादा मते मिळाली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शरदचंद्र पवार पक्षाने वाई मतदारसंघात लक्षकेंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. मुळात वाई विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मकरंद पाटील हे आमदार आहेत.त्यांच्या दोन साखर कारखान्यांना अजित पवार यांच्यामुळे 450 कोटींची थक हमी मिळाली आहे. त्यामुळे ते कोणत्याही परिस्थितीत अजित पवार यांची साथ सोडणार नाहीत.
वाई मतदारसंघातील राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी त्यांना शरद पवार यांच्या पक्षात जावे असा आग्रह धरला आहे. पण, भाजपकडून लवकरच उदयनराजेंना सातारा लोकसभा मतदारसंघ सोडल्यामुळे अजित पवार यांची राष्ट्रवादी आता आमदार मकरंद पाटील यांचे बंधू जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांना राज्यसभेच्या जागेवर संधी देऊन खासदार केले जाणार आहे. त्यामुळे या सर्व संधी सोडून ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार नाहीत. त्यामुळे शरद पवार पक्षाने यावेळेस मतदारसंघात लक्ष केंद्रित करून येथून उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे.

या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या सोबत पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात वाई मतदारसंघातील पदाधिकऱ्याची बैठक झाली. यामध्ये शरद पवार यांनी इच्छुकांपैकी एकाच्या नावावर एकमत करण्याची सूचना केली आहे. तसेच आगामी महिन्यात वाई तालुक्याला दोन दिवस आढावा घेण्यासाठी शरद पवार हे वेळ देणार आहेत.
त्यामुळे अजित पवार यांचे आमदार मकरंद पाटील यांना अडचणीत आणण्याची शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची रणनिती सुरू झाली आहे. या बैठकीस डॉ.नितीन सावंत,रमेश धायगुडे,बंडू ढमाळ,प्रसाद सुर्वे, दिलीप बाबर, विजयसिंह पिसाळ, अमित जगताप, ग्याबरीयल फर्नांडीस, निलेश डेरे, आबा मालुसरे, संतोष कारंडे, हे उपस्थित होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here