यशवंत नगर : यशवंतनगर (ता. कराड) येथील महादेव डोंगर परिसरात शनिवारी (दि. 15) रात्री 9 च्या सुमारास लागलेल्या वणव्यात दुर्मीळ वनसंपदा नष्ट झाली. वणवा लावणार्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे.
महादेव डोंगर उतारावर सह्याद्री कारखान्याच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले आहे. या डोंगरावर शनिवारी रात्री 9 च्या सुमारास लागलेल्या वणव्यात वनसंपदा, वन्यप्राणी व पक्षी आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. वणवा लागल्याचे समजताच सह्याद्री कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील हे अग्निशमन यंत्रणा व सुरक्षारक्षकांसह घटनास्थळी दाखल झाले. मात्र, डोंगराच्या मध्यावर आग असल्याने नियंत्रण मिळवण्यात अडचण येत होती. तीन ते चार तासांच्या अथक परिश्रमानंतर वणवा आटोक्यात आणण्यात सुरक्षारक्षकांना यश आले. त्यांच्या प्रयत्नांमुळे उर्वरित क्षेत्र वाचवण्यात आले.
सह्याद्री कारखान्याच्या माध्यमातून महादेव डोंगर उतारावर दरवर्षी वृक्षलागवड करण्यात येते. मात्र, वणवा लावण्यामुळे ही वनसंपदा नष्ट होत आहे. सरपटणारे प्राणी व पक्षी आगीत होरपळत आहेत. वणवे लावणार्या प्रवृत्तींवर कारवाई करावी.
– आबासाहेब पाटील, कार्यकारी संचालक
सुरक्षारक्षकांच्या धाडसामुळे वणवा आटोक्यात
डोंगरावर वणवा लागल्याचे समजताच सह्याद्री साखर कारखान्याच्या दहा सुरक्षारक्षकांनी डोंगराकडे धाव घेतली. वणवा आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे उर्वरित वनसंपदा व कारखान्याची मालमत्ता सुरक्षित राहिली.